कोकणातील हापूसच्या नावाखाली परराज्यातील आंब्यांची विक्री

वसई : रत्नागिरी, देवगड येथील हापूसला अधिक मागणी असल्याने विक्रेते कोकणातील हापूसच्या नावाखाली कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथील आंबा विकत असल्याचे चित्र वसई-विरारमधील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. यातील बहुतेक आंबे रासायनिक प्रक्रियेने पिकवले जात असून ही ग्राहकांची फसवणूक असल्याचे ग्राहक संरक्षण समितीकडून सांगण्यात आले आहे.

सध्या आंब्याचा हंगाम जोरदार सुरू आहे. वसई, नालासोपारा, विरारच्या बाजारात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातून हापूस, पायरी यांसह विविध जातीचे आंबे बाजारात आले आहेत. त्याचबरोबर दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ यांसह गुजरात, मध्य प्रदेश येथील आंबेही बाजारात आले आहेत. मात्र हे आंबे कोकणातील हापूस असल्याचे सांगून ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. कोकणातील हापूस दर्जेदार असल्याने त्याची किंमत अधिक आहे. कर्नाटक, मध्य प्रदेशातील आंबे हापूसच्या मानाने स्वस्त असतात. मात्र विक्रेते ते हापूस असल्याचे सांगून ग्राहकांची लूट करत आहेत.

कोकणातील हापूस ४०० ते ६०० रुपये डझनने बाजारात मिळतो. त्यामानाने कर्नाटकच्या आंब्याची किंमत खूपच कमी असते.

मात्र कर्नाटकचे आंबे कोकणातील हापूसच आहेत, असे ग्राहकाला सांगून आकर्षित केले जाते आणि अधिक पैसे मिळवले जातात.

वसईत कोकणातील आंबे विकणारे १० ते १५ घाऊक व्यापारी आहेत.

त्यांच्याकडून खरा हापूस कसा ओळखावा हे ग्राहकांनी जाणून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

.. तर फसवणुकीपासून दूर राहाल!

अन्य राज्यांतील आंबा नैसर्गिकरीत्या पिकवला जातो का याची खात्री करता येत नाही. ग्राहकांना त्यामुळे चविष्ट आंब्याची चव चाखता येत नाही. कोकणातील आंबे विक्री करणाऱ्या वसईतील व्यापाऱ्यांकडून याची माहिती घेतल्यास फसवणुकीपासून दूर राहता येईल.

रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली सर्रास सर्वसामान्यांच्या माथी कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश येथील आंबे मारले जात आहेत. हे आंबे रासायनिक प्रक्रियेने पिकवले जात असून ते शरीरासाठी घातक आहेत, तसेच या आंब्यांना चकाकी येण्यासाठी पावडर मारली जाते. 

– विजय वैती, सदस्य, ग्राहक संरक्षण समिती