बदलापूर पश्चिमेत काही भागांत २६ आणि २७ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे कपडय़ांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नवेकोरे कपडे पुराच्या पाण्यात भिजल्याने नुकसानीच्या भीतीने अस्वस्थ झालेल्या व्यापाऱ्यांनी आता या कपडय़ांची अर्ध्या किमतीत विक्री सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या कपडय़ांच्या खरेदीसाठी जिल्हाभरातून खरेदीदारांची झुंबड उडू लागली आहे.

बदलापूर पश्चिमेतील सवरेदय नगर परिसरात अनेक दुकाने आहेत. किराणा, कापड, इलेक्ट्रॉनिक अशा विविध दुकानांचा यात समावेश आहे. २६ आणि २७ जुलै रोजी या भागात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या भागात सध्या महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र मूळ नुकसानीपेक्षा कमी नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे व्यापारी सांगतात. या कापड दुकानांना मोठा फटका बसला आहे. त्यात शासकीय मदत आणि विमाच्या माध्यमातून पूर्ण मोबदला मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने या व्यापाऱ्यांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. आपल्या दुकानातील भिजलेला माल निम्म्या किमतीत या व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी काढला आहे. गेल्या तीन दिवसांपासून दुकानाच्या बाहेर यासाठी विशेष स्टॉल लावला जात असून त्यावर भिजलेले कपडे निम्म्या किमतीत विकले जात आहेत. यात महिलांच्या साडय़ा, पंजाबी ड्रेस, कुर्ता पायजमा, पुरुषांचे तयार शर्ट, पँट, टी शर्ट, अंतर्वस्त्रे आणि विविध कापडांचा समावेश आहे. हे कपडे चांगले स्वच्छ धुऊन सुकवल्यास ते पुन्हा वापरता येणे शक्य आहे. मात्र त्याची मूळ किमतीत विक्री करता येणे शक्य नसल्याने हा पर्याय निवडल्याचे व्यापारी सांगतात.

विमा आणि नुकसानभरपाई किती मिळेल ते सांगता येत नाही. त्यामुळे कपडे फेकून देण्यापेक्षा काही प्रमाणात यातून पैसे मिळाले तरी नुकसान काही अंशी भरून काढता येईल. त्यासाठीच हा खटाटोप सुरू आहे.

– विक्रांत मेहता,  मालक, ललित पॅलेस