तीन शहरांत ५० लाखांहून जास्त किमतीच्या ४८६ मोटारींची विक्री

किशोर कोकणे

ठाणे : करोनाकाळात लागू करण्यात आलेले निर्बंध आणि टाळेबंदी यांमुळे गेले वर्षभर विविध क्षेत्रांत आर्थिक मंदीचे वातावरण असले तरी, वाहनखरेदीचा वारू मात्र वेगाने दौडत आहे. ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर या तीन शहरांमध्ये तर ५० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या आलिशान मोटारींनाही चांगली मागणी आहे. या काळात मर्सिडिज, रोल्स रॉइस, पजेरो अशा ४८६ आलिशान मोटारींची विक्री झाली.

१ जानेवारी २०२० ते २५ जून २०२१ या दीड वर्षांच्या कालावधीत ठाणे, भिवंडी आणि मीरा भाईंदर या तिन्ही शहरांमध्ये ४८६ आलिशान कारची विक्री झाली. यात २०२१ मधील १ जानेवारी ते २५ जून या कालावधी १७७ वाहनांची नोंद झाली आहे, तर २०२० मध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत ३०९ वाहनांची नोंदणी झाली आहे. या सर्व कारची किंमत ५० लाख रुपयांहून अधिक आहे.

२०२० मध्ये सर्वाधिक महागडी कार असलेल्या रोल्स रॉयस या अत्यंत महागडय़ा कारचीही विक्री झालेली आहे. नोंदणी असलेल्या या सर्व वाहनांना १३ टक्के कर लावण्यात आल्याने सरकारच्या तिजोरीमध्येही भर पडली आहे. २०१८ आणि २०१९ या वर्षांतही आलिशान वाहनांची विक्री मोठय़ा प्रमाणात झाली होती. २०१८ मध्ये ६३० आणि २०१९ मध्ये ५५२ आलिशान कारची विक्री झाल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीत समोर आले आहे.

मर्सिडिजला पसंती

ग्राहकांनी सर्वाधिक पसंती मर्सिडिज, टोयोटा या कंपन्यांच्या कारला आहे. वर्षभरात विक्री झालेल्या ४८६ कारपैकी १०८ मर्सिडिज, ९६ टोयोटा, ७५ फोर्ड, ६८ बीएमडब्ल्यू, ४६ स्कोडा आणि २० जॅगवार कंपन्यांच्या कारची विक्री झाल्याची नोंद आहे. उर्वरित वाहनांमध्ये ऑडी एजी, लॅम्बोर्गिनी, पोर्शे जर्मनी, रोल्स रॉयस, टाटा, फोक्सव्ॉगन एजी, फेरारी, वॉल्वो ऑटो, फियाट, मारुती सुझूकी, महिंद्रा अँड महिंद्रा यांचा समावेश आहे.