अंबरनाथ पूर्वेकडील आंबेडकरनगर परिसरातील एका हेअर कटिंग सलूनशेजारी लघुशंका करण्यास विरोध केल्याचा राग धरत संबंधित तरुणांनी हेअर कटिंग सलून दुकानदार व त्याच्या कुटुंबावर शस्त्राने हल्ला केला. यामध्ये कुटुंबीय गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
अंबरनाथ पूर्व भागात आंबेडकर नगर परिसरात मधुकर सुर्वसे यांचे अर्जुन हेअर कटिंग सलूनचे दुकान आहे. या दुकानाशेजारी कारंडे यांचे कुटुंबातील लोक रोज उघडय़ावर लघुशंका करत असत. याविरोधात सुर्वसे यांनी प्रशांत कारंडे यांना दुकानाशेजारी लघुशंका करण्यास मनाई केली होती. या गोष्टीचा कारंडे यांना राग आला. त्यांनी आपल्या साथीदारांसह शनिवारी संध्याकाळी तीक्ष्ण हत्यारांनी दुकानात येऊन मारहाण केली.सुर्वसे यांना सोडविण्यास गेले असता कुटुंबीयांवरही हल्ला करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.