29 September 2020

News Flash

नक्षलवाद्यांच्या तावडीतून गावकऱ्यांची सुटका

१२ एप्रिल २०१३ रोजीचा दिवस. सकाळी नऊ वाजता पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाघ आणि नितीन बडगुजर यांना सिदेसूरच्या जंगलात नक्षलवादी लपले असल्याची माहिती मिळाली.

| August 27, 2015 04:38 am

सलाम शूरवीरांना
पोलीस दलातील परिविक्षाधीन काळ (प्रोबेशन पीरियड) हा खूप सारे शिकण्याचा असतो. प्रत्येक तरुण अधिकारी या कालावधीत आपले भविष्यातील स्वप्न घडविण्यासाठी धडपडत असतो. परिविक्षाधीन काळात पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाघ आणि पोलीस उपनिरीक्षक नितीन बडगुजर यांच्या कारकीर्दीची सुरुवात गडचिरोलीत झाली. गडचिरोलीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या सी-६० पथकात या दोघांनीही स्थान पटकावले.
१२ एप्रिल २०१३ रोजीचा दिवस. सकाळी नऊ वाजता पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाघ आणि नितीन बडगुजर यांना सिदेसूरच्या जंगलात नक्षलवादी लपले असल्याची माहिती मिळाली. अवघ्या एका तासात तयारी करून सी-६०चे बटालियन कमांडर भयाजी कुलसंगे आणि नागेश टेकान यांच्या मदतीने त्यांनी आपल्या पथकासह सिदेसूर जंगलाच्या दिशेने कूच केले. साधारणत: अकराच्या सुमारास अचानक त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू झाला. सर्व पोलिसांनी या गोळीबाराचा सामना करण्यासाठी तयारी केली. पोलिसांच्या समोर उभ्या ठाकलेल्या हिरव्या गणवेशातील काही नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना पकडून आणि त्यांना समोर करून पोलिसांवर गोळीबार सुरू केला. नक्षलवाद्यांवर गोळीबार केला तर निष्पाप गावकऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो असा पेच वाघ आणि बडगुजर यांच्या पुढे निर्माण झाला. निष्पाप गावकरी जोपर्यंत सुरक्षितपणे बाजूला होत नाहीत तोपर्यंत गोळीबार न करण्याचा आदेश त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना दिला आणि नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले.
गडचिरोलीतील या गावकऱ्यांना त्यांच्या बोलीभाषेत सुरक्षित स्थळी जाण्यास सांगणे अतिशय अवघड काम होते. नक्षलवाद्यांकडून गोळीबार झाला तर निष्पाप गावकऱ्यांचे प्राण जाऊ शकतात. या गावकऱ्यांना वाचवणे आवश्यक आहे, हे पोलिसांनी मनाशी नक्की केले. पोलीस नाईक गोिवद फरकाडे, शागिर शेख, पंकज गोडसेलवार यांनी स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता नक्षलवाद्यांचा हा चक्रव्यूह भेदला आणि गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलिसांकडून अचानकपणे चक्रव्यूह भेदल्यामुळे डगमगलेल्या नक्षलवाद्यांनी मोठय़ा प्रमाणात गोळीबार सुरू केला. नक्षलवाद्यांच्या गोळीबारात गोिवद फरकडे यांना गोळ्या लागल्या आणि ते जागीच कोसळले. आपला साथीदार जखमी अवस्थेत पडलेला पाहून त्याच्या मदतीसाठी शागिर शेख व दिलीप गोडसेलवार धाडसाने पुढे आले. एकीकडे जखमी फरकडेला गोळीबारात ‘कव्हर’ करणे आणि दुसरीकडे गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविणे अशी दुहेरी जबाबदारी पोलीस शिपाई शेख व गोडसेलवार यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडली. त्यांच्या या अतुलनीय धाडसी कामगिरीमुळे नक्षलवाद्यांच्या तावडीतून सर्व गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यास सुरुवात झाली. नक्षलवाद्यांच्या तावडीतून गावकऱ्यांची सुखरूप सुटका झालेली दिसताच वाघ आणि बडगुजर यांनी आक्रमण करण्याचा आदेश दिला आणि पोलिसांचा आक्रमक पवित्रा पाहून नक्षलवाद्यांनी दुर्गम जंगलात पळ काढला. महाराष्ट्र पोलीस दलातील अतुलनीय शौर्य बजाविणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाघ, पोलीस उपनिरीक्षक नितीन बडगुजर, पोलीस हवालदार कुलसंगे, पोलीस नाईक गोिवद फरकाडे (मरणोत्तर), शागीर शेख, पंकज गोडसेलवार, नागेश टेकाम यांच्या या कामगिरीला आणि त्यांच्या शौर्याला सलाम.
– डॉ. रश्मी करंदीकर,पोलीस उपायुक्त, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 4:38 am

Web Title: salute valiant
Next Stories
1 स्थापत्यशास्त्राचे आरसपानी सौंदर्य!
2 ठाणे मेट्रोचा मार्ग मोकळा!
3 सेकंड होम आणि शेतीची हौस
Just Now!
X