|| दिशा खातू

सामवेदी ब्राह्मण समाज / भाग- ३

कलात्मकता किंवा कलेचा स्पर्श असलेला सामवेदी समाज आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, गरजांनुसार बदल स्वीकारत गेला. शेती, इतर जोडधंद्यासह या वसईतल्या निसर्गरम्य प्रदेशात कुटुंबांच्या सोयीनुसार विशिष्ट वास्तूंची निर्मिती केली आणि काळाच्या ओघात ती एक वास्तुशैली किंवा गृहरचना म्हणून आजच्या पिढीच्या समोर आली. मानवी संस्कृतीमध्ये गृहसंस्थेला अधिक महत्त्व दिलेले आहे. गृह म्हणजे निवासस्थान ज्याला वैदिक वाङ्मयात ‘आयतन’ असे संबोधले आहे.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती आल्यामुळे घरे मोठी होती. कधी कधी तर सर्व सगेसंबंधी मिळून ५० जणही एका घरात राहात असत. घरापुढे मोठे अंगण, मग लाकडी प्रवेशद्वार जिथे लाकडी फळीवर काही प्रतीके कोरलेली असत. पुढे साधारण ५०० चौरस फुटांचा ओटला असे, तिथेच लाकडी सुंभांनी बांधलेला झोपाळा, बाजवट किंवा खराटी म्हणजेच लांब एकाच रेषेतली आसनव्यवस्था असे. त्याचबरोबर उखळ, जातं, घरटं आणि पापड बनवण्यासाठी लागणारा दगड ठेवलेला असे. उन्हाळ्यात तसेच लग्न सोहळ्याप्रसंगी शेजारच्या महिला एकत्र जमून पापड बनवत. पुढच्या भागात मोठी ओसरी (आजच्या काळातली ड्रॉइंग रूम) याच्या दोन्ही बाजूने कारवी किंवा बाबूने विभागून बनवलेल्या खोल्या असत. या खोल्या घरातील माणसांनुसार कमी-जास्त असत. खोल्यांमध्ये मोठय़ा लाकडी पेटय़ा असत. ज्यात उंची कपडे, दागदागिने ठेवले जात. त्या पेटीची झडप उघडून अडकवण्यासाठी वरच्या बाजूला फळी लावून ठेवलेली असे. या पेटय़ांचा वापर कपाटाप्रमाणे केला जात होता, तसेच झोपण्यासाठी चारपाई (खाट) खोलीत ठेवलेली असे. घरात लाकडी माळा बनवलेला असे. त्याला माजी किंवा माडीवरील खोली असे म्हटले जात होते. तिथे जाण्यासाठी घरातील एका बाजूला लाकडी जिना लावलेला असे. बांबूच्या वेतापासून बनवलेल्या आणि शेणाने सारवलेल्या कणगीमध्ये भात तसेच वर्षभराची चिंच आणि बियाणांसाठी धान्य इत्यादी अनेक गोष्टी माळ्यावर साठवण्यात येत होत्या. मागच्या बाजूला एकत्रित स्वयंपाकघर असे. परसात एक विहीर त्याच्या एका बाजूला कपडे-भांडी धुण्यासाठी दगड असे तर दुसऱ्या बाजूला न्हाणीघर असे. त्याच्या बाजूला गुरांचा गोठा असे. घराला लागून एक बेडं म्हणजे खोली असे, ज्यात गुरांसाठी लागणारे गवत, पेंडा तसेच जळाऊ  लाकडे, फावडा, कुदळ, विळा, कोयता, नांगर इत्यादी शेतीची अवजारे ठेवली जात होती. ही घरे दगड-चुना, माती किंवा चुना-मातीच्या विटा किंवा कारवीचे कूड-बांबू, गवताचे छप्पर, मातीची कौले कालांतराने मंगळोरी कौले इत्यादींचा वापर करून घरे बनवली जात होती. पावसाळ्यापूर्वी कौले साफ करण्याचा कार्यक्रम असे. सर्व शेजारची पुरुष मंडळी मिळून हे काम करत असे.

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एवढी मोठी घरे राहिलेली नाहीत. प्रत्येकाचे कुटुंब वेगळे होते, आजूबाजूला घरे बांधू लागले, ज्यातून आळीचा जन्म झाला. एकाच कुटुंबातील घरे लागून बनू लागल्यामुळे त्या संपूर्ण त्या विशिष्ट कुटुंबाचीच घरे असत. म्हणूनच जोशी आळी, वझे आळी इत्यादी अशी आळ्यांची ओळख निर्माण झाली. काही प्रमाणात अशा आळ्या आजही वसईत दिसून येतात.

सध्या ही पारंपरिक घरे दुर्मीळ झाली आहेत. सिमेंट काँक्रीट, स्लॅबचा वापर करून बंगलेवजा घरे बनवली आहेत. घरांमधील सर्व वस्तू आत्याधुनिक आहेत, ज्यामुळे सर्व काम सहज होतात. मात्र या आधुनिक गृहरचनेत ओटल्याचा आकार लहान झाला तरी, आजही झोपाळे (वेगवेगळ्या प्रकारचे) पाहायला मिळतात. घराच्या प्रवेशद्वाराजवळील दर्शनी भागात लाकडी फळीवर कोरलेली श्रद्धेची प्रतीके काही घरांत लावलेली दिसतात.

disha.dk4@gmail.com