संपदा जोगळेकर-कुलकर्णी अभिनेत्री
‘काचेच्या कपाटातून पुस्तक डोकावून पाहत होतं. किती तरी दिवस झाले मी त्याला स्पर्शही केला नव्हता. खरं तर संपर्क ही त्याची गरज नव्हती आणि पुस्तक वाचून झाल्यावर माझीही. ‘अगं मग रद्दीत देऊन टाक’, एक मन मला सागते. मात्र दुसऱ्याच क्षणी तो विचार झटकून टाकते. कारण एखाद्या पानावर चहाचा थेंब असेल, एखाद्या कोपऱ्यावर तेलाचा डाग असेल, दोन मिटल्या पानांत सुकलेलं फूल असेल, त्या लेखकालाही माहीत नसलेले खूप संदर्भ आहेत त्या पुस्तकात माझे. थोडं बेशिस्त वाटेल पण मी ठेवली आहेत अशी खूप पुस्तके जपून..
माझ्या पुस्तकांविषयी मी लिहिलेल्या या माझ्या भावना. माझ्या घरात सगळी शिक्षण क्षेत्रातील मंडळी होती. त्यामुळे काही प्रमाणात वाचनाचे वातावरण होते. माझे बाबा हायकोर्टात होते. ते न्यायाधीशांची भाषणे लिहून घरी आणायचे. आमच्याशी संवाद साधायचे. त्यातून वेगवेगळ्या तऱ्हेची चर्चा आमच्यात व्हायची. तेव्हा बाबा शिक्षक नसले तरी खूप पुस्तके वाचायचे याची जाणीव झाली. घरची परिस्थिती त्या वेळी बेताचीच होती. त्यामुळे पुस्तके खरेदी करून वाचणे होत नव्हते. मात्र ग्रंथालयातील पुस्तके घरात येत होती आणि त्यातून साहित्य, वाङ्मयाची ओळख होत होती. लहानपणी वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेत मी खूप सहभागी व्हायचे. बाबा तेव्हा भाषणे लिहून द्यायचे. त्या वेळी लिहून दिलेल्या भाषणातील मजकूर कोणत्या पुस्तकातील आहे हेही सांगायचे. त्यामुळे आपोआपच ते पुस्तक माझ्याकडून वाचले जायचे. बाबांची ही क्लृप्तीच मला वाचनाची सवय लागण्यास उपयुक्त ठरली असे मला वाटते. सूत्रसंचालन करायला लागल्यावर एकाच प्रकारचे वाचन करून आपल्याला चालणार नाही याची जाणीव मला झाली. विविध प्रकारांतील साहित्य वाचायला मी सुरुवात केली. सध्या निबंध, ललित, कविता, छायाचित्र, चित्रपटनिर्मिती अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील तीन हजार पुस्तकांचा संग्रह माझ्याकडे आहे. माहिती तंत्रज्ञानविषयक काही पुस्तके आहेत. शेतीविषयक शंभर पुस्तकांचा खजिना संग्रहात आहे. दिलीप कुलकर्णी यांचे निसर्गायन, शेतीपर्यटनविषयक श्रीपाद अच्युत दाभोळकर यांची पुस्तके वाचते. ज्याचा उपयोग मला मी करत असलेल्या शेत लागवडीसाठी होतो. डॉ. सलीम अली यांची या संदर्भातील काही पुस्तके वाचते.
मला ललित लेखन वाचायला जास्त आवडते. मंगला गोडबोले, गंगाधर गाडगीळ, अरुणा ढेरे, अच्युत गोडबोले, पु. ल. देशपांडे यांचे साहित्य अधिक भावते. पु. ल. देशपांडेंच्या साहित्यात प्रत्येक वेळी काही तरी वेगळे वाचायला मिळते. ललित लेख कमी शब्दांचे असतात, मात्र त्यांचा आवाका मोठा असतो. त्यामुळे एखादे हवे असलेले बीज पटकन या ललित लेखांत मिळते. सध्या अशोक समेळ यांचे ‘अश्वत्थामा चिरंजीव’ हे पुस्तक वाचत आहे. सध्या माझे बरेचसे वाचन कामासंबंधित होते. या वाचनाचा उपयोग मला कामात होतो. प्रकाशयोजना, चित्रपटनिर्मितीची पुस्तके वाचते. द स्क्रिप्ट रायटिंग प्रोसेस, कम्प्लिट फोटोग्राफी यांसारख्या इंग्रजी पुस्तकांचा उपयोग संबंधित काम करताना होतो. शांताबाई शेळके यांनी किश्शांचा, प्रसंगाचा, अनुभवाचा एकत्रित ‘मधुसंच’ नावाचा संग्रह माझ्याजवळ आहे. याशिवाय मुकुंदराज, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, कान्होपात्रा, फादर स्टीफन्स या अशा अनेकांच्या कवितांचा संग्रह करून तो एका संचात मी एकत्र केलेला आहे. अच्युत गोडबोले यांनी सही केलेले किमयागार, मुशाफिरी, ना. धों. महानोर यांची स्वाक्षरी असलेले कवितांचे पुस्तक, वसंत कानेटकर यांची स्वाक्षरी असलेले नाटकाचे पुस्तक अशा आठवणी पुस्तकांच्या माध्यमातून जपून ठेवल्या आहेत. पूर्वी वाचनासाठी खूप वेळ होता. ‘ऑल द बेस्ट’ नाटकाच्या टूरवेळी रेल्वेत प्रवास करताना मी पुस्तके वाचायचे. तेव्हा अंकुश आणि भरत पुस्तकातील किडा म्हणून चिडवायचे. मात्र आता स्वत:चा राग येतो. कारण मी स्वत: ड्राइव्ह करत असल्याने प्रवासात वाचन होत नाही. पण मी वेळ मिळेल तेव्हा कधीही वाचते.
माझ्या लग्नाआधी नवऱ्याने मला ‘इटकू पिटकू’ हे पुस्तक दिले होते. हे पुस्तक माझ्याकडून हरवले. ते पुस्तक मला परत मिळावे अशी खूप इच्छा होती. तब्बल २२ वर्षांनी हे पुस्तक मला माझ्या माहेरच्या कपाटामागे पडलेले सापडले आणि तो वेगळाच आनंद होता.
शब्दांकन- किन्नरी जाधव