मनोर येथे पकडलेल्या त्या ट्रकमध्ये काय? अहवालानंतर स्पष्ट

जिल्ह्यात वाळू उत्खननावर असलेल्या बंदीचा फायदा घेत रेडीमिक्सच्या नावाखाली बाहेरील वाळू येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोर येथे पोलिसांनी कारवाई केलेल्या त्या ट्रकमध्ये वाळू आहे की रेडीमिक्स हे अहवालानंतर स्पष्ट होणार असले तरी वारंवार उघड होत असलेल्या या घटनांमुळे वाळूतस्करीची दाट शक्यता आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मनोर येथे नांदगावनजीक अवैधरीत्या रेती वाहतूक करीत असलेले पाच ट्रेलर पकडले.

यात असलेल्या गोणीत रेती आहे याची खात्री पटल्यानंतर त्यांनी या ट्रेलर पुढील कारवाईसाठी मनोर स्थानिक पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मात्र पकडलेल्या ट्रकमध्ये रेती नसून रेडीमिक्स असल्याचे त्यांच्याकडे असलेल्या पावतीमध्ये आढळून आले. म्हणून चौकशीनंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, असे मनोर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सिद्धबा जायभोये यांनी सांगितले आहे.

त्यानंतरच गुन्हा

पुढील तपासासाठी मनोर पोलिसांनी मंडल अधिकारऱ्यांना सांगितले असून त्यांचा अहवालानंतरच ट्रेलरचे चालक व मालक यांचेवर गुन्हा दाखल होईल असे पोलीस सांगत आहेत. मात्र गेल्या आठवडय़ात अशाच पद्धतीने चुकीचे परवाने वापरणाऱ्या ११ ट्रकवर चारोटी येथे धाड टाकली व त्यांच्यावर कासा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यामुळे रेडीमिक्सच्या नावाखाली वाळूची तस्करी होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.