News Flash

पुन्हा एकदा ‘संगीत सौभद्र’

महाराष्ट्रीय व्यक्तीच्या आवडीनिवडीचा विषय निघाला की, ज्या दोन चार गोष्टी चटकन समोर येतात

महाराष्ट्रीय व्यक्तीच्या आवडीनिवडीचा विषय निघाला की, ज्या दोन चार गोष्टी चटकन समोर येतात, त्यातील एक म्हणजे नाटय़संगीत. ती प्रत्येक मराठी माणसाच्या मर्मबंधातली ठेव आहे. १९ व्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेला मराठी नाटय़संगीताचा प्रवास आता २१ व्या शतकातही टिकून आहे. अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ असलेली संगीत नाटके शंभर वर्षांहून अधिक काळ निरनिराळ्या पिढीतील नाटय़कर्मी सादर करीत आले आहेत. त्यापैकी एक नाटक म्हणजे संगीत सौभद्र. १८८२ मध्ये अण्णासाहेब किलरेस्कर यांनी संगीत सौभद्रचा पहिला प्रयोग सादर केला. तेव्हापासून आतापर्यंत या नाटकाचा गोडवा कायम आहे.

त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सावाचे औचित्य साधून डोंबिवली पूर्व येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाने शास्त्रीनगर सभागृहात संगीत सौभद्र या नाटकाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम गेल्या शुक्रवारी रात्री आयोजित केला. या नाटय़संगीत मैफलीत संगीतातील विविध राग, ताल, सूर आणि सुभद्राच्या लग्नक था ऐकण्यात सारेच सभागृह तल्लीन झाले होते. या निमित्ताने गंधर्व ठेक्याचेही पुन्हा एकदा स्मरण झाले. गंधर्व ठेक्याची ओळखच मुळात नाटय़संगीतातून झाली आहे. या आठवणीला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. सुभद्रेला तिचे लग्न तिच्या मनात घर केलेल्या पार्थाशी करायचे आहे. मात्र घरच्यांनी तिचे लग्न कौरवपुत्र दुर्योधनाशी ठरविले आहे. त्यामुळे जणू काही आपल्याला आगीत लोटले जातेय, असे सुभ्रदाला वाटतेय. त्या चिंतेचे मळभ तिच्या मनात दाटून आले आहे. ‘सुभद्रा’ या पात्राचे वाचन वेध अ‍ॅक्टग अकदमीच्या मधुरा ओक हिने केले तर पार्थ, बलराम अशा पात्रांचे वाचन संकेत ओक यांनी केले. कृष्णाच्या पात्राचे वाचन सौरभ सोहोनी आणि कुसुमावती, रुक्मिणी आदी पात्रांचे वाचन प्राजक्ता वैशंपायन हिने केले. या वेळी या पात्रांनी केलेला पेशवाई पोशाखही सर्वाचेच लक्ष वेधून घेत होता तर या संगीत नाटकातील नाटय़संगीताद्वारे उलगडत जाणारी पदे ओमकार प्रभुघाटे आणि नेहा गोरे यांनी सादर केली. त्या अजरामर गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. या वेळी जोगिया या रागातील ‘वद जाऊ कुणाला शरण गं’, ‘बलसागर तुम्ही वेल शिरोमणी’, ‘कोण तुजसम सांग मज गुरुराया’, ‘अरसिक किती हा शेला बाई’, ‘बहुतदिन नच भेटलो सुंदरीला’ आदी गाणी सादर झाली. गौड मल्हार या रागातील ‘नभ मेघांनी आक्रमिले’ या गाण्याला रसिकांनी ‘पुन्हा एकदा होऊन जाऊ दे’ अशी दाद दिली. या वेळी आदित्य वैशंपायन तबला आणि मकरंद वैशंपायन संवादिनीवर साथ देत होते. तालासुरांची खूप छान मैफल यानिमित्ताने जमून आली होती. विशेष म्हणजे थोरांपासून लहानांपर्यंत सर्वानीच नाटय़संगीतावर ताल धरला होता.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिल्यानंतर उत्सवकाळात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल वाढली. पूर्वी उत्सवांच्या निमित्ताने निरनिराळे अभिरुची संपन्न कार्यक्रम होत. अलीकडच्या काळात मात्र डीजे, ढोल पथकांच्या दणदणाटाने या विधायक उत्सवाला विघातक वळण लागले. तेव्हा पुन्हा एकदा पूर्वीसारखे दर्जेदार सांस्कृतिक उपक्रम उत्सवांच्या माध्यमातून राबविले जावेत, म्हणून दत्तनगर उत्कर्ष मंडळाने ‘संगीत सौभ्रद्र’च्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला.

लोकमान्यांनी स्वराज्याची गर्जना केली त्याचे हे शतकी वर्ष आहे. त्यामुळे येथे साकारलेल्या मखराच्या संकल्पनेमध्ये लोकमान्यांचे चिखली येथील घराचा देखावा उभा केला आहे. याशिवाय मंडपात लोकमान्य टिळकांची वाक्येही वाचायला मिळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 2:56 am

Web Title: sangeet saubhadra marathi play
Next Stories
1 मॉलमध्ये महिलांना लुटणारा भामटा अटकेत
2 पूजेतील पत्रीतून आदिवासींचा प्रपंच
3 कल्याणमध्ये श्वानाने पोलिसाचा प्राण वाचविला!
Just Now!
X