News Flash

जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींना ‘त्या’ दिवसांत दिलासा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण व अंबरनाथमधील आठ शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

 

जागतिक महिला दिनी आठ शाळांना सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन्सची भेट

ग्रामीण भागातील मुली आणि महिलांमध्ये मासिक पाळीच्या दिवसांबद्दल पुरेशी जागृती नसल्याने त्यांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. विशेषत: या काळात वयात येणाऱ्या मुलींच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक पाळीच्या काळात मोकळेपणाने वावरता यावे या उद्देशाने येथील व्यवस्थापनाने शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला मंगळवारी सुरुवात झाली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण व अंबरनाथमधील आठ शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या शिफारशींनुसार महिलांच्या कामाच्या ठिकाणी, शाळा-महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन पुरवणाऱ्या मशीन उपलब्ध करून देण्याचे सुचवले आहे. महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागानेही अशा मशीन्स बसवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही अनेक शाळांमध्ये ही सोय उपलब्ध झालेली नाही. ठाणे वाहतूक पोलिसांनी मध्यंतरी महिला कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारचा उपक्रम हाती घेतला असून संपूर्ण आयुक्तालयात अशा प्रकारच्या मशीन्स बसविल्या जाणार आहेत. ठाणे महापालिकेनेही आपल्या शाळांमध्ये विद्यार्थिनी आणि महिला शिक्षिकांसाठी अशाच पद्धतीचा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूदही करण्यात आली आहे.

शहरी भागात अशा प्रकारच्या उपक्रमांनी जोर धरला असताना ग्रामीण भागातही महिला, मुलींसाठी ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत िशदे यांनी मध्यंतरी मांडला होता. यावर जिल्हा परिषद प्रशासनाने आपल्या शाळांमध्ये अशा मशीन्स बसविल्या आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण व अंबरनाथमधील आठ शाळांमध्ये मंगळवारी हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सखारामशेठ स्कूल कोळेगाव, सर्वोदय स्कूल निळजे, कोसुबाल पाटील स्कूल वाकळण, रामभाऊ  विसे बालविकास मंदिर उसाटणे, अभ्युदय विद्यालय द्वारली, संत सावळाराम विद्यालय, ढोके, दहिसर मोरी या आठ शाळांमध्ये या मशीन्स बसवण्यात आल्या. सध्या शाळांमध्ये परीक्षेचे वातावरण आहे. महिला दिनाच्या या कार्यक्रमाला विद्यार्थिनी व महिला शिक्षकांनी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होत्या. सॅनिटरी नॅपकिन्स अगदी सहज उपलब्ध व्हावेत तसेच या विषयाबद्दल समाजात जनजागृती व्हावी, यासाठी हा निर्णय घेतल्याचे या वेळी  शिंदे यांनी सांगितले.

हा विषय महिलांचे आरोग्य व स्वच्छता या विषयाशी निगडित असूनदेखील लाज व भीतीमुळे त्याविषयी उघडपणे बोलले जात नाही. समाजात याविषयी जनजागृती होऊन सकारात्मकता वाढीस लागण्याची गरज या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 2:00 am

Web Title: sanitary napkin vending machine gifted to district council school girls
Next Stories
1 महाशिवरात्री दिवशी तरुणांची अनोखी श्रद्धा
2 अक्षय मोगरकरला ‘ठाणे श्री’चा किताब
3 कलेच्या प्रवाहातून तालासुरांनी रसिकांना रिझवले
Just Now!
X