लाचखोरीच्या आरोपांनंतर पालिकेची कारवाई

लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना मंगळवारी पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अधिनियम, तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या तक्रारीतील कलमान्वये हे निलंबन करण्यात आले, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त मिलिंद धाट यांनी दिली.

घरत यांच्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल व प्राथमिक  तपासणी अहवालाची प्रत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी पालिका प्रशासनाला सादर केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरत यांच्या निलंबनावर आयुक्त दालनात खल सुरू होता. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी दुपारी त्यांच्या निलंबनाचा निर्णय प्रशासनाने घेतला. घरत यांना निलंबनाची नोटीस तातडीने बजावण्यात आली. घरत यांना शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त केले असल्यामुळे पालिका आयुक्तांना त्यांना निलंबित करण्याचा अधिकार नाही, असे सांगण्यात येत होते. परंतु, आयुक्तांनी घरत यांचे निलंबन करण्याचे अधिकार पालिकेचे असल्याचे स्पष्ट केले होते. त्या अधिकारानुसार मंगळवारी आयुक्त बोडके यांनी घरत यांना निलंबित केले. घरत यांचे मुख्यालयातील दालन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सीलबंद केल. या दालनावरील घरत यांची नामपट्टी काढण्यात आली. वाहनतळावरील राखीव जागेवरील नामफलकही गुंडाळून ठेवण्यात आला.