‘स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट’ कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

भगवान मंडलिक, लोकसत्ता 

कल्याण : सव्वाचार वर्षांपूर्वी ठाणे महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रचाराचा मुद्दा बनलेले तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका तोंडावर असताना स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने येथील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चार वर्षे उलटूनही कल्याण डोंबिवली शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या आघाडीवर फारसे समाधानकारक काम झालेले नाही. या कंपनीच्या अध्यक्षपदी असणाऱ्या अधिकाऱ्याला नियंत्रकाची आणि वेळ पडल्यास प्रकल्पांचा आढावा घेण्याचे पूर्ण अधिकार असतात. त्यामुळे रडतखडत सुरू असलेल्या प्रकल्पांना जयस्वाल यांचा आधार शोधण्याचा प्रयत्न सत्ताधारी शिवसेनेकडून झाला आहे का, याविषयी चर्चा रंगली आहे.

ठाणे महापालिकेत असताना जयस्वाल यांची कारकीर्द गाजली होती. या काळात त्यांचे अनेकदा शिवसेना नेत्यांसोबत विसंवाद झाल्याचेही पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होणार हे निश्चित होताच जयस्वाल यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेतले खरे, मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर त्यांची अपेक्षित ठिकाणी बदली झाली नाही, अशी चर्चाही प्रशासकीय वर्तुळात होती. या पाश्र्वभूमीवर कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी या पदावर निवृत्त सनदी अधिकारी यू. पी. एस. मदान कार्यरत होते.

दोन वर्षांपूर्वीच शहरात राबवायचे स्मार्ट सिटी प्रकल्प आणि त्यासाठीच्या कामांचा निधी पालिकेत येऊन पडला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत. हे प्रकल्प गतीने पुढे नेण्यासाठी मागील चार वर्षांच्या काळात एकाही पालिका आयुक्ताने आक्रमकपणे प्रयत्न केले नसल्याची सत्ताधारी, राजकीय मंडळींची खंत आहे. कल्याणमध्ये सीटी पार्क, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात बहुद्देशीय वाहतूक प्रकल्प, कल्याण पूर्वेतील रेल्वेच्या ताब्यातील आरक्षण ताब्यात घेऊन तेथे बहुद्देशीय वाहनतळ व इतर सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. या कामाला रेल्वेकडून मंजुरी मिळालेली नाही. रस्ते, जल, मलनिस्सारण प्रकल्प, वीजबचतीसाठी सौर ऊर्जा प्रकल्प, वीजबचत करणारे स्मार्ट एलईडी दिवे शहरात बसविण्यात येणार आहेत. पालिकेची २० वर्षांपूर्वीची संगणकीय यंत्रणा जुनाट झाल्याने त्याऐवजी नवीन सुविधेचा वापर करून रहिवाशांना घरबसल्या पालिका सुविधा उपलब्ध होईल या दृष्टीने नवीन यंत्रणा पालिकेत बसविण्यात येणार आहे. शहरभर सीसीटीव्ही यंत्रणा, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी खुले आणि मोकळे वाहनतळ योजना राबविण्यात येणार आहे. नेहमी चर्चेच्या भोवऱ्यात असलेल्या परिवहन उपक्रमाचा कायापालट स्मार्ट सिटी निधीतून केला जाणार आहे. प्रत्यक्षात मात्र या सगळ्या कामांचा वेग अतिशय मंद आहे. काही कामे अजूनही कागदावर आहेत. असे असताना कंपनीमार्फत या कामांचा आढावा घेण्याचा अधिकार जयस्वाल यांना असणार आहे. त्यामुळे निवडणुका तोंडावर असताना ठाण्यात नावाजलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून शिवसेनेने स्मार्ट सिटी प्रकल्पातील रखडलेल्या कामांचे खापर आपल्यावर फुटणार नाही याची दक्षता घेतल्याची चर्चा रंगली आहे. यासंबंधी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत िशदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. संजीव जयस्वाल यांनी सरकारने नेमून दिलेले काम नेटाने करू, अशी प्रतिक्रिया दिली.