आयुक्त जयस्वाल यांचे महापौरांना प्रतिआव्हान

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी काही नगरसेवकांनी केल्यानंतर त्यासाठी विशेष सभा लवकरच घेण्याचे आश्वासन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले होते. असे असतानाच आयुक्त जयस्वाल यांनी आता थेट महापौर शिंदे यांना पत्र पाठवून निवडणूक आचारसंहितेपूर्वीच अविश्वास ठराव आणण्यासाठी विशेष सभा घेण्याचे प्रतिआव्हान दिले आहे.

दिल्ली येथे  शासकीय कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे लागल्यामुळे २७ ऑगस्ट रोजी  सभेला उपस्थित राहू शकलो नाही. या सभेमध्ये गरजू, दुर्बल, अंध, अपंग आणि आर्थिकदृष्टय़ा मागास घटकांसाठी काही नावीन्यापूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले होते.  या प्रस्तावांवर चर्चा करताना काही नगरसेवकांनी व्यंगात्मक टिप्पणी केली. या प्रस्तावांबाबत तपशीलवार माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना व्यक्तिगत  लक्ष्य करण्यात आले. त्याचप्रमाणे  माझ्यावरही आक्षेपार्ह टीकाटिप्पणी करण्यात आली आणि हे सर्व प्रस्ताव नामंजूर करण्यात आले, असे जयस्वाल यांनी पत्रात म्हटले आहे.

आयुक्तांची उद्विग्नता

नि:स्वार्थपणाने गेली साडेचार वर्षे या शहराच्या  जनतेला मूलभूत सोयीसुविधा देता याव्यात यासाठी झोकून काम केले. त्यानंतरही  वैयक्तिक आक्षेपार्ह टीका-टिप्पणी झाल्याने मी उद्विग्न झालो आहे. त्यामुळे अशा स्थितीत आयुक्त म्हणून जनतेच्या हिताचे धोरणात्मक निर्णय कसे घ्यावेत, असा प्रश्न मला पडला आहे. त्यामुळे अविश्वास ठराव आणण्यासाठी लवकर विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी. जेणेकरून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या विषयाबाबत यशोचित निर्णय घेणे सभागृहाला सोयीस्कर ठरेल, असे जयस्वाल यांनी पत्रात म्हटले आहे.