अधिकाऱ्यांच्या बहिष्कारानंतरही सत्ताधाऱ्यांचे मौन

शहरातील विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर प्रशासनावर टीकास्त्र सोडणाऱ्या ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनाच राजकीय वर्तुळात एकटे पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. महापौरांवर नाराज असलेल्या पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारच्या सर्वसाधारण सभेवर अघोषित बहिष्कार घातल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी मौन बाळगल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली जात आहे. या सर्वात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हेच वरचढ ठरू लागल्याचीही चर्चा असल्याने नगरसेवकांचा मोठा गट अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाणे शहरात रस्ता रुंदीकरणाची कामे मोठय़ा झोकात करणाऱ्या प्रशासनाचे विस्थापितांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर शिंदे यांनी प्रशासनावर टीकेचे आसूड ओढले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी बुधवारच्या सभेत अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. सचिव वगळता एकही वरिष्ठ अधिकारी या सभेकडे फिरकला नाही. आयुक्तांनी बैठक बोलाविल्याचे कारण यासाठी पुढे करण्यात आले असले तरी हा अघोषित बहिष्कार असल्याची चर्चा असून महापौरांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे जयस्वाल विरुद्ध महापौर अशी चकमक सुरू असली तरी, ठाण्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मात्र मनोमीलन झाले आहे. शिंदे यांच्याशी जयस्वाल यांनी जुळवून घेतल्यानंतर महापालिकेत अनेक वादग्रस्त प्रस्तावांना मंजुरी दिल्याचा मुद्दाही गाजत होता. महापौर मीनाक्षी िशदे मात्र यापैकी काही प्रस्तावांना तसेच शहरातील महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रशासनाला धारेवर धरण्याची संधी सोडत नाही असे दिसून आले आहे. रस्ते रुंदीकरणाची टिमकी सर्वत्र वाजवली जात असली तरी विस्थापितांचे हाल होत आहेत त्याचे काय, हा महापौरांचा प्रश्न  प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला असून त्यातून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही ठरावीक नगरसेवकांना एकत्र करून महापौरांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू  झाल्याची चर्चा आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या नाकावर टिच्चून प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सभेला अनुपस्थितीत राहूनही पक्षात शांतता असल्याने जयस्वाल यांच्यापुढे शिवसेना झुकली अशी टीका भाजपच्या एका नगरसेवकाने केली. प्रशासनाविरोधात उघडपणे बोलण्याची सध्या कुणाचीही टाप नसून त्यामुळे माझे नाव उघड करू नका, अशी विनंतीही या नगरसेवकाने केली. याविषयी आयुक्त संजीव जयस्वाल यांना लघुसंदेशाद्वारे विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले नाही.

नागरिकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे ठाणेकर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठीच महासभेत आलेले असतात. मात्र बुधवारी अधिकाऱ्यांनी महासभेवर जो अघोषित बहिष्कार टाकला त्यातून हेच निष्पन्न होते की, प्रशासन व्यवस्थेला नागरिकांची काही एक कदर नाही. या बहिष्काराचे मुख्य सूत्रधार पालिका आयुक्तच आहेत हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. स्वराज अभियानतर्फे प्रशासन व्यवस्थेचा आम्ही निषेध करतो.

संजीव साने राज्य सचिव, स्वराज अभियान

सभेवर अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला की नाही याबाबत मला माहिती नाही. परंतु सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांची नियोजित आढावा बैठक होती. सर्वसाधारण सभा त्याच दिवशी पुन्हा सुरू होईल याबाबत कदाचित प्रशासनाला माहिती नसावी. त्यामुळे ही सभा तहकूब करावी लागली.

मीनाक्षी िशदे, महापौर

ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला एकही अधिकारी उपस्थित नव्हता, हे अपयश खरे तर सत्ताधारी शिवसेनेचे आहे. आमच्या माहितीप्रमाणे आयुक्तांनी मार्च महिन्याच्या अखेरची कामे उरकण्यासाठी सभा घेऊ नये अशी विनंती केली होती.

हणमंत जगदाळे, गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस