ठाण्यात आज ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह’;  संजीव जयस्वाल, गोविंद बोडके यांची प्रमुख उपस्थिती

ठाणे : ठाणे, डोंबिवलीच्या वेशीवर होणारी अजस्र अशी कोंडी, अधिकृत घरांच्या विक्रीपुढे बेकायदा बांधकामांच्या वाढीचे उभे राहिलेले आव्हान, पायाभूत सुविधांच्या उभारणीतील अडचणी, पुनर्विकासातील अडथळे. बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या विविध समस्यांसह नवीन ठाणे, कल्याण विकास केंद्र अशा मोठय़ा विकास प्रकल्पांची सविस्तर चर्चा शुक्रवारी होणाऱ्या ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोिवद बोडके हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतील घरांच्या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या किमतीमुळे प्रतिमुंबईतील शहरांमधील बांधकाम उद्योगाला मंदीच्या काळातही वाव असल्याचे चित्र आहे. अनेक वर्षांपासून ठोस अशा नियोजना शिवाय वाढणाऱ्या या शहरांमधे पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. मेट्रो, उड्डाणपूल आणि विस्तीर्ण रस्त्यांच्या प्रकल्पांची आखणी केली जात असून या प्रकल्पांमुळे या शहरांच्या बांधकाम क्षेत्रालाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. ठाणे आणि डोंबिवली शहरात नव्या औद्यागिक वसाहती निर्माण करण्यासोबतच स्मार्ट आणि नियोजनबद्ध शहरांची उभारणी करण्याचे विचार गेल्या काही वर्षांपासून बोलून दाखविले जात आहेत. या शहरांच्या विकासाला दिशा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असले तरी या शहरांमधील पायभूत सुविधांची वानवा आणि शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेली बांधकामे आणि त्या माध्यमातून निर्माण झालेले प्रश्न येथील ही येथील नव्या बांधकाम उद्योगासाठी डोकेदुखी ठरत आहेत. या प्रश्नांचा आणि उपलब्ध संधींची सविस्तर चर्चा या कार्यक्रमात तज्ञांच्या उपस्थित केली जाणार आहे.

ठाणे, कल्याण डोंबिवली यासारख्या शहरांमधील बेकायदा बांधकामांच्या पुर्नविकासाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. जुन्या ठाण्यातील अधिकृत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात अनेक अडचणी आहेत. राज्य सरकारकडे यासाठी दोन चटईक्षेत्र निर्देशांकाची मागणी करण्यात आली आहे. या प्रश्नांचा ऊहापोह कार्यक्रमात केला जाणार आहे. नवीन ठाणे या संकल्पनेची सद्य:स्थिती, कल्याण विकास केंद्राची उभारणी यासारख्या विषयांनाही या वेळी स्पर्श केला जाणार आहे.

प्रायोजक

‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०१९’चे नरेड्को हे इंडस्ट्री पार्टनर असून होरायझन हॉस्पिटल हे हेल्थकेअर पार्टनर आहेत. तर रिजन्सी ग्रुप, जेव्हीएम स्पेसेस, रोसा ओअ‍ॅसिस आणि मोहन ग्रुप हे इव्हेन्ट पार्टनर आहेत.