गुलजार यांच्या अनुवादित पुस्तकांच्या प्रकाशनाचा मान
जन्मत:च तिच्यात श्रवणक्षमतेचा अभाव होता. ऐकूच येत नसल्याने आपली मुलगी बोलायला कशी शिकणार, अशी चिंता तिच्या आईवडिलांना सतावत होती. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पावणेतीन वर्षांच्या सान्वीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि तिला ऐकता, बोलता येऊ लागले. त्यानंतर अल्पावधीतच सान्वीने मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा अवगत केल्या आणि सर्वसामान्य मुलांसारखी सराईतपणे बोलू लागली. सान्वीच्या या जिद्दीलाच सलाम करण्याचा प्रयत्न म्हणून आज, मंगळवारी विख्यात गीतकार गुलजार यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा तिच्या हस्ते घडवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, दस्तुरखुद्द गुलजार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, त्यांच्यासमोर सान्वीला भाषण करण्याची संधीही मिळणार आहे.
गुलजार यांनी मुलांसाठी लिहिलेल्या नऊ पुस्तकांचा मराठी अनुवाद असलेल्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मंगळवारी ठाण्यात रंगणार आहे. त्यात सान्वी मजारे हीदेखील वलयांकित चेहरा असणार आहे. ठाण्यातील युनिव्हर्सल शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या सान्वीची जन्मत: श्रवणशक्ती कमकुवत होती. मात्र ती पावणेतीन वर्षांची असताना डॉ. प्रदीप उप्पल यांनी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून कानात कॉनक्लेअर यंत्रणा बसवली. त्यामुळे तिला ऐकता आणि पर्यायाने बोलता येऊ लागले. सध्या ती इतर सर्वसाधारण मुलांप्रमाणे जीवन जगत आहे. ठाणे जिल्ह्य़ात सध्या डॉ. प्रदीप उप्पल यांचे रुग्णालयवगळता इतरत्र कुठेही श्रवणदोष चाचणीची सोय उपलब्ध नाही. प्रत्येक सरकारी रुग्णालयात ती उपलब्ध व्हावी, यासाठी डॉ. उप्पल प्रयत्नशील आहेत. त्यांनी आतापर्यंत ४० मुलांवर शस्त्रक्रिया करून त्यांना मूकबधिरत्वाच्या शापापासून मुक्त केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून गुलजार यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यानिमित्ताने सान्वीला ही संधी मिळाली आहे. गुलजार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्याची संधी सान्वीला मिळणे हा तिच्या तसेच आमच्या आयुष्यातील फार मोठा भाग्ययोग आहे, अशी प्रतिक्रिया सान्वीची आई अपर्णा मजारे यांनी व्यक्त केली आहे.

जगात जन्माला येणाऱ्या एक हजार मुलांमागे चार मुलांमध्ये श्रवण क्षमतेचा अभाव असतो. ऐकू येत नसल्याने त्यांच्यावर भाषा संस्कारही होऊ शकत नाहीत. परिणामी पुढील आयुष्यात मूकबधिर म्हणून त्यांना जीवन कंठावे लागते. या चाचणीसाठी फारसा खर्च येत नाही. मात्र तीन वर्षांनंतर श्रवणदोष लक्षात येऊनही त्यावर उपाय करता येत नाही. सान्वीचे सुदैव की पावणेतीन वर्षांची असताना माझ्याकडे आली. तिला सर्वसाधारण मुलांप्रमाणे हसता-बागडताना पाहून वाटणारे समाधान ही माझ्यासाठी फार मोठी समाधानाची बाब आहे. – डॉ. प्रदीप उप्पल, कान, नाक, घसातज्ज्ञ