नीलाद्रीकुमार, तळवलकर, अनुव्रत चटर्जी रंगत भरणार
गेली सात वर्षे सातत्याने भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी काम करणाऱ्या सप्तसूर या संस्थेच्या वतीने १३ व १४ फेब्रुवारी रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे सप्तसूर फेस्टिव्हल २०१६ या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रख्यात गायिका गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांचे गायन, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतारवादक नीलाद्रीकुमार यांचे सतारवादन आणि विवेक सोनार यांच्या बासरीवादनाने हा संगीत महोत्सव रंगतदार ठरणार आहे.
या महोत्सवाची सुरुवात शनिवार १३ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतारवादक नीलाद्रीकुमार यांच्या सतारवादनाने होणार आहे. प्रसिद्ध तबलावादक सत्यजित तळवलकर त्यांना तबल्यावर साथ करणार आहेत. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रसिद्ध बासरीवादक विवेक सोनार यांच्या बासरीवादनाने या दिवसाच्या संगीत समारोहाची सुरुवात होणार आहे. तबलावादक अनुव्रत चटर्जी तबल्यावर साथ करणार आहेत. समारोप प्रख्यात गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या गायनाने होणार आहे. रात्री ८.३० वाजता त्यांचे गायन सुरू होणार असून संगीत रसिकांना ती एक पर्वणी ठरणार आहे. त्यांना प्रसिद्ध व्हायोलीनवादक मिलिंद रायकर, भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) हे कलाकार साथ करणार आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे हा संगीत समारोह होणार आहे.