22 February 2019

News Flash

चला, विशेष मुलांच्या ‘सोबती’ला!

विशेष मुलांच्या संगोपनाचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई-ठाण्यातील पालकांनी एकत्र येऊन ‘सोबती पालक संघटना’ स्थापन केली.

|| प्रशांत मोरे

विशेष मुलांच्या संगोपनाचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई-ठाण्यातील पालकांनी एकत्र येऊन ‘सोबती पालक संघटना’ स्थापन केली. गेल्या १४ वर्षांत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, नियमित आरोग्य शिबिरे, थेरेपी केंद्र ते टुमदार निवासी संकुल उभारण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.

कोणत्याही सरकारी मदतीशिवाय केवळ स्ववर्गणी आणि दात्यांच्या मदतीने ‘सोबती’ने वाडा तालुक्यात तिळसा इथे विशेष मुलांना कायमस्वरूपी राहता येईल, अशी अतिशय देखणी वास्तू उभारली. या निवासी केंद्रात ५० विशेष मुला-मुलींच्या राहण्याची सोय आहे. सुरुवातीची दहा वर्षे ठाणे आणि मुंबई येथील केंद्रात ‘सोबती’च्या विशेष मुलांची शाळा भरत होती. निवासी केंद्र सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षांपासून ही विशेष मुले तिथे राहात आहेत. या केंद्राचे वैशिष्टय़ असे की, सोमवारी सकाळी ठाणे-मुंबईतून ही मुले त्यांच्यासाठी व्यवस्था असलेल्या खास बसने तिळसा इथे जातात. पुढील पाच दिवस तिथे राहतात आणि शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा आपल्या घरी येतात. या व्यवस्थेमुळे विशेष मुलांच्या पालकांना बाकी प्रापंचिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांसाठी वेळ मिळतो. तसेच शनिवार-रविवार घरी येण्याची मुभा असल्याने विशेष मुलांची कौटुंबिक ओढही कायम राहते.

या विशेष मुलांसोबत तज्ज्ञ प्रशिक्षकही असतात. या केंद्रात सकाळी सात ते रात्री साडेनऊपर्यंत मुलांना त्यांची दिनचर्या ठरवून देण्यात आलेली आहे. या केंद्रात मुलांनी अधिकाधिक स्वावलंबी व्हावे, किमान स्वत:ची कामे स्वत: करावीत, यासाठी प्रयत्न केले जातात. भविष्यात या केंद्रात वाडा परिसरातील विशेष मुलांसाठी विनामूल्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा संस्थेचा विचार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विशेष मुलांना मोठा आधार मिळू शकेल.

तिळसा येथील केंद्राचा सध्याचा वार्षिक व्यवस्थापन खर्च ३० लाखांच्या घरात आहे. पालकांची वर्गणी आणि हितचिंतकांनी दिलेल्या देणगीतून सध्या कशीबशी जमाखर्चाची तोंडमिळवणी केली जाते. त्यामुळे हे केंद्र भविष्यात सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी समाजातील दानशूरांकडून मदतीचा हात मिळणे गरजे आहे. नागरिकांनी यथाशक्ती मदत करून ‘सोबती’ परिवाराच्या दृढनिश्चयाला साथ द्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.

First Published on September 15, 2018 1:17 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2018 2