इमारत बांधण्यासाठी ५१ लाखांचा निधी

वडिलोपार्जित मालमत्ता योग्य ठिकाणी सार्थकी लागावी, म्हणून लोकसत्ता ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातील एका नियमित दात्याने दिलेल्या भरघोस देणगीतून कल्याण तालुक्यातील फळे गावातील एका शाळेला स्वत:ची टुमदार वास्तू लाभली आहे. टिटवाळ्यापासून १३ किलोमीटरवर ही इमारत बांधण्यासाठी लागलेले ५१ लाख रुपये विनाअट देऊन मुंबईतील श्रीराम नाखरे यांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

घटत्या पटसंख्येमुळे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडणाऱ्या बहुतेक मराठी माध्यमांच्या शाळांपुढे इमारतींची दुरुस्ती आणि पुनर्बाधणीचा मोठा प्रश्न आहे. कल्याण तालुक्यातील फळे गावातील गंगा गोरजेश्वर विद्यामंदिर शाळेला तर स्वत:ची इमारतच नव्हती. छत्रपती शिक्षण मंडळाच्या या शाळेतील आठवी ते दहावीचे वर्ग भाडय़ाच्या जागेत भरतात. या शाळेत एकूण १५० विद्यार्थी शिकतात. गेली काही वर्षे संस्था शाळेची स्वत:ची इमारत बांधण्याच्या प्रयत्नात होती. एका ग्रामस्थाने शाळेच्या वास्तूसाठी २० गुंठे जागा दिली होती, मात्र इमारतीसाठी निधी संकलन करावे लागणार होते. गरजू गुणवंतांना उच्चशिक्षणासाठी मदत मिळवून देणाऱ्या विद्यार्थी विकास योजना या संस्थेचे रवींद्र कर्वेही या शाळेसाठी दात्यांचा शोध घेत होते.

गेल्या वर्षी ठाण्यात झालेल्या संस्थेच्या वार्षिक संमेलनातील मनोगतात त्यांनी फळे गावातील शाळेचा उल्लेख केला होता. ‘लोकसत्ता सर्वकार्येषु’मुळे विद्यार्थी विकास योजनेच्या संपर्कात आलेल्या मुंबईतील श्रीराम नाखरे यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यांनी थोडीथोडकी नव्हे ५१ लाख रुपयांची देणगी दिली. त्यामुळे काही महिन्यांतच शाळेची वास्तू उभी राहिली.

‘ पुढील महिन्यापासून नव्या इमारतीत वर्ग भरतील. वास्तू प्रशस्त असल्याने विद्यार्थ्यांना संगणक, खेळ आदी अन्य सुविधा उपलब्ध करून देता येतील. त्यासाठी श्रीराम नाखरे तसेच विद्यार्थी विकास योजनेचे आभारी आहोत,’ अशा शब्दांत छत्रपती शिक्षण मंडळाचे मनोहर ठाकुरदेसाई यांनी आनंद व्यक्त केला.

आमच्या सासूबाई शाळेत मुख्याध्यापिका होत्या. निवृत्तीनंतरही त्यांच्या पैशांचा योग्य ठिकाणी विनियोग व्हावा, म्हणून फळेतील शाळेला निधी देण्याचा निर्णय घेतला.  उपलब्ध झालेल्या प्रशस्त जागेत विद्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतील. दान सत्पात्री गेले, याचा आनंद आहे.

– श्रीराम नाखरे