ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांबाबत मिम, विनोदी संदेश

ठाणे : पावसाळ्यामुळे डांबरासकट धुून निघालेल्या रस्त्यांवरून प्रवास करायचा म्हटलं की, वाहनचालकासह प्रवास करणाऱ्यांची हाडं खिळखिळी होणं आलंच. त्यासोबतच संथगती वाहतुकीमुळे होणारा विलंब, शेजारून जाणाऱ्या वाहनामुळे उडणारा चिखल असे वेदनादायी प्रसंगातही रोजचेच. पण अशा परिस्थितीतही ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांची विनोदबुद्धी शाबूत आहे. त्यामुळेच सध्या समाजमाध्यमांवर खड्डेमय रस्त्यांवर व्यंगात्मक भाष्य करणारे संदेश, मिम आणि चित्रफितींचा भडिमार होत आहे. काही कल्पक नेटकरींनी तर ‘रॅप’ गीताच्या माध्यमातून नागरिकांचे हाल संगीतबद्धही केले आहेत.

ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. पावसामुळे पडलेले खड्डे, ते बुजवण्यासाठी टाकलेली बारीक खडी रस्ताभर पसरून रस्ते म्हणजे अपघातांना निमंत्रण ठरू लागले आहेत. यावरून नागरिकांत प्रचंड संताप आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आता समाजमाध्यमांचा आधार घेऊन त्यावर खड्डय़ांची समस्या मांडण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटर या समाजमाध्यमांवर नागरिकांकडून खड्डय़ांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र, या संतापाला वाट मोकळी करून देताना अनेकजण विनोदाचाही आधार घेत आहेत. सिनेमाचे संवाद असलेल्या ‘मिम’ वापरून खड्डय़ांवरून प्रशासकीय यंत्रणांची खिल्ली उडवल्याचे संदेश समाजमाध्यमांवर लोकप्रिय झाले आहेत.

पत्री पुलावर ‘रॅप’ गीत

गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या पत्री पुलामुळे कल्याण शहरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असतानाच शहरात पडलेल्या खड्डय़ांमुळे कोंडीत भर पडली आहे. या समस्येमुळे मेटाकुटीला आलेल्या कल्याणकरांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी कल्याणमधील काही तरुणांनी ‘पत्री पूल कब बनेगा’ हे रॅप गाणे तयार केले आहे. या गाण्यात शहरात वाढलेली वाहतूक कोंडी आणि खड्डय़ांविरोधात भाष्य करण्यात आले आहे. ‘स्टेटय़ुन’ या यू टय़ूब वाहिनीवर प्रसिद्ध झालेले हे गाणे आतापर्यंत ५० हजारहून अधिक जणांनी पाहिले आहे.

काही मजेदार संदेश

* लवकरच ठाणे शहर स्वाभिमान संघटनेतर्फे स्वच्छ खड्डे, सुंदर खड्डे, लहान खड्डे आणि मोठे खड्डे निर्मितीस कारणीभूत असणाऱ्या निर्लज्ज ठेकेदारांना पारितोषिक देण्यात येणार आहे.’

* आमच्याकडे निवडणूका घेऊ नये, पण तो वाचलेला पैसा रस्त्यावर खर्च करा.. बाकी आमदार तूम्ही टॉस उडवून निवडले तरी चालतील’ – #त्रस्त भिवंडीकर

* शोले चित्रपटातील विरू आणि जय यांच्यातील संवाद

विरू – इतनी चोट कैसे लगी जय?

जय – येताना भिवंडी मार्गाने आलो म्हणून!

* एक मुलगा विनाचष्मा एका ठिकाणी पाहतो तेव्हा त्याला चंद्र दिसतो.

त्यानंतर तो चष्मा लावून पाहतो तेव्हा त्याला त्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमधील खड्डे दिसतात.

ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

खड्डय़ांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नागरिक ट्विटरची मदत घेत आहेत. दररोज किमान आठ ते दहा अशा तक्रारी महापालिकांच्या अधिकृत ट्विटर खात्यांवर आणि इतर खात्यांवर येत आहेत. खड्डय़ांविरोधात ट्विटरवर #खड्डे आणि #जिवघेणेखड्डे अशा मोहिमा चालविल्या जात आहेत.