१२ विद्यार्थी जखमी
कल्याण पूर्वेतील नांदिवली गावातील आर्य गुरुकुल शाळेत गुरुवारी दुपारी फुगे भरणाऱ्या गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन फुगेवाला जागीच ठार झाला. फुगे घेण्यासाठी जमा झालेल्या विद्यार्थ्यांमधील १२ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या विद्यार्थ्यांवर कल्याण, डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांना हे फुगे दिले जात होते. काही फुगे भरून झाल्यानंतर अचानक सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की फुगेवाला राम प्रसाद हा काही फूट उंच उडून शाळेच्या पत्र्यावर पडला आणि तेथून जमिनीवर कोसळला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या स्फोटानंतर एकच हलकल्लोळ उडाला. स्नेहसंमेलनात फुगेवाल्याला आणल्याबद्दल पालक संतप्त झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी आर्य गुरुकुल व्यवस्थापन तसेच सिलिंडर मालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
आदिराज चौधरी, अजय प्रसाद, पवन परब, श्रीनिवास पांडे, दामोदर पाटील, दीप्ती पवार, प्रवीण महाजन, प्रियंका मोरे, लकी महाजन, कौशल्य पवार, प्रियाशू पांडे, लोकेश महाजन अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे असून हे सर्व चार ते पाच वर्षांचे आहेत.