पाणीटंचाईमुळे बळी गेल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप

कळव्यातील भास्करनगरमधील गुलिफज्ज परवीन मोहम्मद अनम अन्सारी या ११ वर्षीय मुलीचा रेल्वे रूळ ओलांडताना लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. भास्करनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने ती कुटुंबासोबत रूळ ओलांडून पाणी घेऊन येत असताना तिचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा   स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. मात्र या प्रकरणी केवळ अपघाताची नोंद असल्याची माहिती  पोलीसांनी दिली.

कळवा परिसरात तीव्र पाणीटंचाई असून या भागात बुधवार ते शुक्रवार सुमारे ६० तासांची पाणी कपात करण्यात येते. तसेच त्यानंतरच्या दोन दिवस परिसरामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो. कळवा आणि मुंब्रा परिसरामध्ये ही टंचाई भयावह आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. कळवा भागातील भास्करनगरमधील भागात आठवडय़ातून चार ते पाच दिवस पाणी येत नसल्याने या परिसरातील लोकांना रेल्वे रूळ ओलांडून वाघोबानगर येथून पाणी आणावे लागते. रविवारी सायंकाळी गुलिफज्ज ही मुलगी कुटूंबियांसोबत पाणी आणण्यासाठी वाघोबानगर येथे गेली होती. तेथून परत येताना लोकलचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला.

वाघोबानगरला पाणीपुरवठा होत असला तरी  तेथूनच जवळ असलेल्या भास्करनगरमध्ये मात्र पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीच अस्वस्थता पसरली असून याविषयी संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी ही मुलगी पाणी आणण्यासाठी गेली होती का याविषयीची नोंद मात्र नसल्याचे रेल्वे पोलीसांकडून सांगण्यात आले.

शहरातील इतर भागात सुरळीत पाणी पुरवठा होत असताना कळवा आणि मुंब्रा भागात तीव्र पाणी टंचाई आहे. पाण्याच्या वितरण व्यवस्थेतील त्रृटींमुळे इथे पाणीटंचाई असून पाण्यासाठी जीव गमवावा लागणे हे अत्यंत दुदैवी आहे, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी सांगितले.

कळव्यातील सगळ्या भागात सारखीच परिस्थिती असून वारंवार मागणी करूनही या भागात पाण्याचा योग्य पुरवठा केला जात नाही. त्यामुळे येथील नागरिकांना मिळेल तेथे पाण्यासाठी धाव घ्यावी लागते. पाणी घेऊन येत असताना लोकलच्या धडकेत गुलिफज्जा हीचा मृत्यू झाला हे धक्कादायक आहे.

– रिटा यादव, नगरसेविका