24 August 2019

News Flash

शाळा ४० वर्षे शौचालयाविना

विरारमधील एका जिल्हा परिषद शाळेत मागील ४० वर्षांपासून शौचालयच नसल्याचे समोर आले आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

प्रसेनजीत इंगळे, विरार

विरारमधील एका जिल्हा परिषद शाळेत मागील ४० वर्षांपासून शौचालयच नसल्याचे समोर आले आहे. शौचालय नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांची कुचंबणा होत असून त्यांना रस्त्यावरच नैसर्गिक विधी उरकावे लागत आहेत.

विरार पूर्वेकडील गोपचार पाडा येथे ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. विरारमधील जिल्हा परिषदेची ही सर्वात जुनी शाळा आहे. सध्या या शाळेत गोरगरिबांची मुले शिकत असून पटावरील संख्या २०० हून अधिक आहे. या शाळेत ३ महिला आणि एक पुरुष असे चार शिक्षक आहेत. पहिली ते पाचवीपर्यंत ही शाळा आहे. या शाळेची इमारत जर्जर झाल्याने १० वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. सध्या ही शाळा कपोल ट्रस्टच्या जागेत भरवली जाता आहे. पण १० वर्षे उलटूनही इमारत बांधण्यात आली नाही.

या शाळेला मागील ४० वर्षांपासून शौचालयच नाही. यामुळे जिथे स्वच्छतेचे धडे गिरवले जातात, तेथेच विद्यार्थ्यांना रस्त्यावर आपले विधी उरकावे लागत आहेत. शौचालय नसल्याने विद्यार्थी-शिक्षक विशेषत: मुलींची मोठी गैरसोय होते. त्यांना एक तर रस्त्यावर आपले विधी उरकावे लागतात किंवा ५०० मीटर लांब असलेल्या दुसऱ्या शाळेत जावे लागते. येथील महिला शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही दिवसभर पाणी पीत नाही. जर गरज असली तर दुसऱ्या शाळेत जातो अथवा येथील नागरिकांच्या घरी जाऊन यावे लागते.

या शाळेतील काही माजी विद्यार्थ्यांनी या संदर्भात पुढाकार घेत महापालिकेला निवेदन दिले आहे. पण पालिकेने अजूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एकीकडे सरकार स्वच्छ भारत अभियानासाठी कोटय़वधी रुपये जाहिरातीवर खर्च करत आहे. उघडय़ावर शौच करू नका- शौचालयाचा वापर करा अशी शिकवण विद्यार्थ्यांना शाळेत दिली जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या या शाळेतील शिक्षकांना शौचालय नसल्याने कुचंबणा सहन करत रस्त्यावर विधी उरकरण्याची लाजिरवाणी परिस्थिती ओढावली आहे. वारंवार तक्रारी करूनही या मूलभूत प्रश्नाकडे कुणी लक्ष दिले नाही.

शाळेला शौचालय नसणे ही केवढी शरमेची बाब आहे. विद्यार्थी बिचारे रस्त्यावर आपले विधी उरकतात. हे पाहून आम्हाला मोठे दुख: होते, असे योगेश अभ्यंकर यांनी सांगितले.

आम्ही या शाळेला भेट दिली आहे. खरेच वाईट परिस्थिती आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांची गैरसोय होते. जागेचा अभाव असल्याने आम्ही शौचालय बांधू शकलो नाही. आम्ही जागेच्या शोधात आहोत.

-माधवी तांडेल, गट शिक्षण अधिकारी

First Published on July 24, 2019 4:18 am

Web Title: school without toilet since last 40 years zws 70