निवडणूक कामांमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी एकीकडे शासनातर्फे शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांवर नवनवीन अभ्यासपद्धती व योजना राबवण्याचे आदेश दिले जात असतानाच, सध्या सुरू असलेल्या निवडणूक हंगामात शिक्षकांना आपले अध्यापन कर्तव्य बजावणेही कठीण बनले आहे. महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी शिक्षकांना कामाला जुंपण्यात आल्याने शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी सध्या वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. त्यातच सध्या अनेक शाळा, महाविद्यालयांत परीक्षा सुरू असल्याने शिक्षकांचा बराचसा वेळ या कामातच खर्च होत आहे.

यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरूअसल्याने पर्यवेक्षकांची जबाबदारी सांभाळून निवडणुकीचे कामकाज शिक्षकांना करावे लागत आहे. ठाणे परिसरातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयातील वीस ते पंचवीस शिक्षकांना निवडणुकीची कामे देण्यात आली आहेत. ६ फेब्रुवारीला शिक्षकांचे पहिले प्रशिक्षण पार पडले. यानंतर १६, २० आणि २१ फेब्रुवारी रोजी शिक्षकांना निवडणुकीचे कामकाज आहे. या काळात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे वर्ग अवघ्या दोन तासांसाठी भरवले जात आहेत. तसेच शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत असल्याने दोन वर्ग एकत्र बसवून शिक्षकांना शिकवावे लागत आहे, अशी माहिती ठाण्यातील शाळामधील शिक्षकांनी ‘लोकसत्ता’ला दिली. शाळा महाविद्यालयापासून लांबच्या पल्ल्यावर निवडणूक कामाची जबाबदारी देण्यात आल्याने शिक्षक वर्गाकडून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिका शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने तीन इयत्तांसाठी एकच शिक्षक आहेत. असे असले तरी महापालिका शाळेतील शिक्षकांनाही निवडणुकांची जबाबदारी देण्यात आल्याने एकाच शिक्षकाला दोन किंवा तीन वर्गावर लक्ष ठेवावे लागते. त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो. परीक्षा काळात शिक्षक निवडणुकांच्या कामासाठी गेल्याने पर्यवेक्षकांची कमतरता भासते. परीक्षा काळात बाहेरील पर्यवेक्षकांची नेमणूक केल्यास पारदर्शी परीक्षणाची शाश्वती देता येत नाही, असे जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांनी सांगितले.

शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांवर निवडणूक कामकाजांचा अतिभार नसावा. निवडणुकीच्या कामासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. बेरोजगार व्यक्तींना निवडणुकीच्या काळात कामांचे वाटप केल्यास त्यांना रोजगार मिळेल. शैक्षणिक काम, परीक्षांचे वेळापत्रक सांभाळून निवडणूक काम करणे शिक्षकांना अडथळा ठरत आहे. या संदर्भात यंत्रणेकडे पत्रही पाठवले होते.

– डॉ. शकुंतला सिंग, प्राचार्या, जोशी बेडेकर महाविद्यालय.