श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा उपक्रम

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : राज्य शासनाने ऑनलाइनद्वारे शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी ठाणे जिल्ह्य़ातील दुर्गम, आदिवासी पाडय़ांवरील विद्यार्थ्यांकडे मोबाइल उपलब्ध नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहापूर आणि वाडा तालुक्यातील आदिवासी भागातील घरांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू केले आहेत.

श्रमजीवी संघटनेचे दहावीपासून पुढे शिक्षण घेतलेले कार्यकर्ते विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

आदिवासी, दुर्गम भागातील मुलांची शाळेची ओढ आणि पालकांची मागणी विचारात घेऊन श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमासाठी त्यांनी तालुकावार काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खडू, फळा आणि इतर शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून दिली आहे. दहावी पुढचे शिक्षण झालेल्या कार्यकर्त्यांची इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा दररोज दोन ते तीन तास अभ्यास घेण्यासाठी नेमणूक केली आहे.

या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वाडा आणि शहापूर तालुक्यातील आदिवासी पाडय़ांवर ३० शाळा सुरू झाल्या आहेत. पाडय़ांवरील मोठय़ा घरांमध्ये ही शाळा भरते. या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाप्रमाणे शिक्षण दिले जात आहे. याशिवाय, चित्रकला, देशभक्तीपर गीते, सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रासंगिक परिस्थितीवर गाणी, संघर्षगीते विद्यार्थ्यांना शिकविली जात आहेत, असे शहापूर तालुक्यातील श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी सांगितले.

शहरी, ग्रामीण भागांत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अभ्यास वर्ग सुरू झाले आहेत. आदिवासी, दुर्गम भागात अनेक पालकांकडे भ्रमणध्वनी नाहीत. तेथे नेटवर्क नाही. त्यामुळे ही मुले ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नाहीत. तसेच भ्रमणध्वनी असेल तर दरमहा नेटपॅकचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेने ऑनलाइन अभ्यास प्रणालीला विरोध केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून घरगुती शाळांचा उपक्रम सुरू केला आहे. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एका वर्गात २० ते ४० विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेच्या शासकीय शाळा नियमित सुरू होत नाहीत तोपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे, असे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

ज्या वाडी, पाडय़ांमध्ये करोनाचा संसर्ग नाही, १० पेक्षा अधिक मुले शाळेत जाणारी आहेत अशा वाडय़ांमध्ये श्रमजीवी संघटनेने घरगुती शाळा सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तीन महिने शाळा आणि अभ्यासापासून वंचित असलेली मुले या वर्गात येत आहेत. अशा शाळा कोविड साथ आहे तोपर्यंत प्रत्येक वाडीवर सुरू करा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

– प्रकाश खोडका, सचिव, श्रमजीवी संघटना, शहापूर तालुका.