20 February 2019

News Flash

प्लास्टिकबंदीसाठी शाळांचाही पुढाकार

शिजवलेले अन्नपदार्थ हे गरम असताना प्लास्टिकच्या डब्यात भरल्यानंतर त्याचा अन्नावर कसा परिणाम होतो.

(संग्रहित छायाचित्र)

विद्यार्थ्यांना पोळीभाजीसाठी स्टीलचा डबा आणण्याचे बंधन

ऋषीकेश मुळे, ठाणे

राज्यभर लागू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी ठाण्यातील काही शाळांनी पुढाकार घेतला आहे. प्लास्टिकच्या आकर्षक डब्यांऐवजी विद्यार्थ्यांनी स्टीलचे डबे आणावेत, अशी सक्ती काही शाळांनी केली आहे तर, काही शाळांनी प्लास्टिक संकलनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

वर्तकनगर येथे वर्तकनगर शिक्षण मंडळ संचालित आर बी अंकोला प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या पालक सभेत प्लास्टिकबंदीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्लास्टिकबंदीविषयी पालकांच्या मनात असणारा संभ्रम शिक्षकांनी दूर केला. विद्यार्थ्यांना शाळेत दिले जाणारे जेवणाचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या या शक्यतो स्टीलच्या असाव्यात असे पालकांना सांगण्यात आले. शिजवलेले अन्नपदार्थ हे गरम असताना प्लास्टिकच्या डब्यात भरल्यानंतर त्याचा अन्नावर कसा परिणाम होतो. तसेच शरीराला ते कसे अपायकारक आहेत याचे मार्गदर्शन शिक्षकांकडून करण्यात आले. पालकांनी या निर्णयाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना पोळीभाजी आणि पाणी हे स्टीलच्या डबा-बाटलीतून देण्यास सुरुवात केल्याचे शिक्षकांनी सांगितले.

शिक्षणाबरोबर चालू घडामोडींचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शाळांतर्फे अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. डोंबिवलीतील टिळकनगर शाळेने प्लास्टिक संकलनाचा उपक्रम हाती घेतला आहे. एक विशिष्ट दिवस ठरवून त्या दिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील प्लास्टिक शाळेत घेऊन येण्यास सांगितले जाणार आहे. या प्लास्टिकचे वर्गीकरण करून ते विघटनासाठी ऊर्जा फाऊंडेशन या संस्थेला देण्यात येत असल्याचे  सांगण्यात आले. ठाण्यातील सरस्वती मराठी शाळेनेही प्लास्टिक संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि प्लास्टिकबंदीविषयी जनजागृती म्हणून हा उपक्रम शाळेत राबवत आहोत. पालक आणि विद्यार्थ्यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

– करुणा देहेरेकर, मुख्याधापिका, आर.बी. अंकोला शाळा,

First Published on July 13, 2018 2:08 am

Web Title: schools in thane taking initiative for plastics ban