कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर शाळांच्या बसमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर आता शाळांच्या माध्यमातूनच उत्तर शोधण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. शाळांबाहेरच्या अरुंद रस्त्यांवर बसच्या गर्दीमुळे होणारी कोंडी सोडवण्यासाठी तसेच येथील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी शाळांच्या शिपायांनाच विशेष प्रशिक्षण देण्याचा विचार पोलिसांनी सुरू केला आहे. वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी हा प्रस्ताव पुढे आणला असून आता शाळा व्यवस्थापन यावर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीत शाळेच्या बस अडकून पडतात. मुलांना शाळेत किंवा घरी जाण्यास उशीर होतो. त्यामुळे यावर मार्ग काढण्याची विनंती पालकांच्या संघटनेने वाहतूक पोलिसांकडे केली होती. या पाश्र्वभूमीवर शाळा परिसरातील रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीचे नियोजन करण्यासाठी शिपायांना हाताशी धरण्याचा विचार वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. यासाठी शाळेच्या व्यवस्थापनांसोबत संयुक्त बैठक घेण्यात येणार असून शिपायांना वाहतूक नियमनाचे प्रशिक्षण देण्याचा विचारही पोलीस करत आहेत. शाळांनी आपल्या शाळांच्या वेळा थोडय़ा मागेपुढे केल्यास विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचे लोंढे एकाच वेळी रस्त्यावर येणार नाहीत, अशी सूचना वाहतूक विभागाच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी शाळांच्या व्यवस्थापनांना केली आहे. महापालिकेने प्रस्तावित ठाकुर्ली उड्डाण पूल, गोविंदवाडी वळण रस्ते पूर्ण करावेत. यामुळे वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल, अशी विनंतीही पोलिसांनी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे केली आहे.