शालेय प्रदर्शनातून दर्शन  

डोंबिवली शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असली तरी या शहराला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. डासांचा उपद्रव, कचऱ्याची समस्या, विजेचा तुडवडा, पाण्याची कमतरता, रेल्वे स्थानक आदी समस्यांचा बारकाईने अभ्यास करून त्यावर संभाव्य उपायांचे दर्शन महापालिका शाळांच्या विज्ञान प्रदर्शनातून घडले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे डोंबिवली पश्चिमेतील कोपर येथील जन गण मन या इंग्रजी माध्यम शाळेमध्ये दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात कल्याण डोंबिवलीमधील ११० शाळांनी सहभाग घेतला होता. कृषी व अन्न सुरक्षा, शहर स्वच्छता, स्मार्ट सिटी, सौरऊर्जा, विजेची बचत, पाण्याचा पुनर्वापर, घरगुती विविध यंत्रे, वनौषधींचे फायदे आदी विविध विषयांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले होते.

शहरात उद्भविणाऱ्या समस्यांवर अनेक उपायांनी मात करणे शक्य असते. मात्र आपल्याला त्यांची एकतर माहिती नसते किंवा आपल्याला समस्यांचा बाऊ करण्याची सवय झालेली आहे. डेंग्यूच्या आजाराने डोंबिवलीत नुकताच एका तरुणाचा प्राण गेला. त्याला कारणीभूत असलेल्या मच्छरांना घरापासून दूर ठेवण्यासाठी शेण, कापूर, धूप, गोमूत्र यांच्या मिश्रणापासून पु. भा. भावे प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खास वडी तयार केली आहे. तसेच उद्यानामधील विविध खेळण्यांच्या साधनातून टाकीत पाणी चढविणे, पाण्याच्या दाबावर क्रेन चालविणे, सेंद्रिय शेती, मत्स्य बीजनिर्मिती, आपत्कालीन व्यवस्थापनातून वीजनिर्मिती, आदी प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले होते.

कालसेकर इंग्लिश स्कूल या शाळेच्या कृषी व अन्न सुरक्षा या विषयावर त्यांनी सादर केलेल्या आविष्कारासाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले. आर.बी.टी. विद्यालयाने घरगुती शीतयंत्र प्रकल्प सादर केला. त्यांना द्वितीय क्रमांक, तर डॉन बॉस्को स्कूल कल्याण या शाळेच्या वीज व पाणी बचत सूचक यंत्रास तिसरा क्रमांक मिळाला. प्रबोधनकार ठाकरे या विद्यालयाने पर्जन्यजल संवर्धनाचा प्रकल्प सादर केला. त्यांना चौथा तर पं. मदन मालवीय या शाळेच्या सौरपंपास पाचवा क्रमांक देण्यात आला. जन गण मन इंग्लिश स्कूलच्या खाण उद्योग प्रतिकृतीस सहाव्या क्रमांकाचे बक्षिस देण्यात आले. टिळकनगर विद्यालय, चंद्रकांत पाटकर विद्यालय, विश्वास विद्यालय, आनंदीबाई जोशी विद्यालय या विद्यालयांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. संगीता विद्यामंदिर व एन.आर.सी. मोहने विद्यालयाला उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल गौरविण्यात आले.

या विज्ञान प्रदर्शनास शाळेच्या संचालिका प्रेरणा कोल्हे, डॉ. राजकुमार कोल्हे, कल्याण डोंबिवली शिक्षण मंडळ विस्तार अधिकारी विजय सरकटे यांचे सहकार्य लाभले.