कळवा येथील ठाणे महापालिकेच्या अद्ययावत तरण तलावामध्ये स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने दिला आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ठाणेकर तरुणतरुणींना भारतीय सैन्य दल तसेच जीवरक्षक म्हणून नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. यासाठी नामांकित पाणबुडय़ांची प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. कळव्यातील प्रशिक्षण केंद्राच्या यशानंतर महापालिकेच्या अन्य तरणतलावांमध्येही असे केंद्र सुरू करण्याची प्रशासनाची योजना आहे.
ठाणे महापालिकेचा कळवा परिसरात ऑलिम्पिक दर्जाचा कै. यशवंत रामा साळवी तरण तलाव आहे. या तलावामध्ये जलतरणासोबतच त्याच्याशी संबंधित अन्य क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण सुरू करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. कळव्यातच राहणारे डॉ. विश्वास सापटणेकर या
पाणबुडी प्रकारातील तज्ज्ञाने या तलावात स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव पालिकेसमोर मांडला होता. त्याला पालिकेनेही मंजुरी दिली असून प्रायोगिक तत्त्वावर कळव्यातील तरण तलावात स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षणाचे वर्ग राबवण्यात येणार आहेत.
या प्रशिक्षणवर्गाच्या एका तुकडीत पाच जणांना प्रवेश देण्यात येणार असून चार आठवडे हे प्रशिक्षण चालेले. यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून पाच हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
तरुणांनी पाणबुडीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले तर त्यांना भारतीय सेवा दलात नोकरी मिळू शकते. तसेच जीवरक्षक म्हणूनही ते काम करू शकतात.
याशिवाय, पूर, त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अशा प्रशिक्षित तरुणांचा बचाव कार्यासाठी उपयोग होऊ शकतो, असा महापालिकेचा दावा आहे.
या प्रशिक्षण केंद्राची उभारणी व उपकरण खरेदीसाठी चार लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
मात्र, पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात यासंबंधी तरतूद झाली नसल्याने या कामासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी लागणार आहे.