गेली अनेक वर्षे बंद असलेली पाणपोयी आता डोंबिवलीकरांच्या औत्सुक्याचा विषय झाली आहे. मानपाडा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ १९९२ मध्ये उभारण्यात आलेल्या पाणपोईचे शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक केतन दुर्वे यांच्या नगरसेवक निधीतून नुकतेच नूतनीकरण व सुशोभूकरण करण्यात आले आहे. पाणपोईच्या भिंतीवर शिल्पचित्र साकारण्यात आले असून त्याद्वारे पाणी वाचविण्याचा संदेश देण्यात आला आहे.
यात विटेला पर्याय असलेल्या सिपोरेक्सच्या ६० ब्लॉक्सचा वापर करण्यात आला आहे. ते सर्व ब्लॉक्स एकत्रित एकमेकांना जोडून हे शिल्प साकारण्यात आले आहे. पाणपोईच्या पदपथाकडील भिंतीवर सुशोभीकरण करण्याची कल्पना ज्येष्ठ शिवसैनिक विजय देशमुख यांनी मांडली होती. डोंबिवलीतील किरण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकार अशोक साळगावकर यांनी हे शिल्पचित्र रेखाटले तर प्रसन्न चुरी व रवींद्र सावंत यांनी ते प्रत्यक्षात साकारले. या चित्रातून पाणी हेच जीवन असून त्यामुळे निसर्गाचेही जतन योग्य पद्धतीने होईल हा संदेश देण्यात आला आहे. पाणपोयांची दुरवस्था आतापर्यंत नागरिक पाहत आले आहेत. डोंबिवलीत पहिल्यांदाच  शिल्पचित्र साकारण्यात आले आहे.