|| हेमेंद्र पाटील

समुद्रात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्याचे प्रमाण घटले  

Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

बोईसर: टाळेबंदीमुळे हवेच्या प्रदुषणाबरोबरच समुद्रातील पाण्याच्या प्रदुषणात कमालीची घट झाली आहे. तारापुर औद्योगिक क्षेत्रातील काही मोजके कारखाने सोडल्यास इतर सर्व प्रदुषणकारी कारखाने बंद आहेत. यामुळे समुद्रात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे किनारा व खाडी भागातील नष्ट झालेले मासे पुन्हा एकदा दिसू लागले आहेत. या लहान माशांमुळे मच्छीमारांची उपजीविका होण्यास सुरुवात झाली आहे.

केंद्र सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी जाहीर केली असल्याने तारापुर औद्योगिक क्षेत्रातील शेकडो रासायनिक कारखाने बंद झाले आहेत. परिणामी ढासळलेले पर्यावरण आणि विद्रूप झालेले समुद्र किनारे आता स्वच्छ दिसायला लागले आहेत. या संचारबंदीमुळे सध्या पालघर मधील पश्चिम किनारपट्टीवरील दांडी, उच्छेळी, मुरबे, नवापूर या मच्छीमारी करणाऱ्या गावांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तारापुर औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषणकारी कारखाने बंद असल्याने मच्छीमारांना समुद्रातील प्रदुषित पाण्याचा सामना करावा लागत नाही. यामुळे समुद्र किनाऱ्यावर आणि खाडी भागात मासेमारी करण्याची आशा मच्छीमारांना दिसू लागली आहे.

समुद्र हेच मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र गेल्या दहा वर्षांंपासून औद्योगिक क्षेत्रातील वाढलेल्या प्रदुषणामुळे येथील पारंपरिक पद्धतीने केली जाणारी मासेमारी पुर्णपणे बंद होण्याच्या स्थितीत होती.

तारापूर औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी असलेले १०३५ कारखाने असुन सुमारे १५० कारखाने छुप्या पध्दतीने उत्पादन घेत आहेत. यामध्ये रासायनिक कारखान्यांची संख्या मोठी आहे.  सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच सांडपाणी समुद्रात सोडले जात असल्याने खाडी किनारी मिळणारे मासे नष्ट झाले होते.

परिणामी येथील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मागील आठ दिवसांपासून या औद्योगिक क्षेत्रातील कारखाने बंद असल्याने रासायनिक सांडपाणी समुद्रात सोडण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामुहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता २५ दशलक्ष लिटर्स इतकी आहे. मात्र याठिकाणी सुमारे ३५ ते ४० दशलक्ष लिटर्स रासायनिक घातक सांडपाणी प्रक्रिया साठी येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अतिरिक्त सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्र सोडले जात होते. परिणाामी येथील खाडी भागातील व समुद्र किनारा भागातील मासेमारी पूर्णपणे संपुष्टात आली होती. मात्र आता करोनामुळे टाळेबंदी असल्याने कारखाने बंद असल्याने येथील समुद्र किनारे व समुद्राचे पाणी स्वच्छ दिसू लागले आहे. समुद्राच्या पाण्यात माशांचा वावरही वाढलेला आहे.

शासनाने ही परिस्थिती पाहून टाळेबंदीनंतर या औद्योगिक क्षेत्रात सुरू होणाऱ्या कारखान्यांनाच्या मालकांना  योग्य ती समज आणि आदेश द्यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

औद्योगिकपरिसरात मोकळा श्वास

बंद असलेल्या कारखान्यांमुळे औद्योगिक क्षेत्र परिसरातील हवेचे प्रदुषण थांबले आहे. रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या विषारी वायूमुळे तारापूर भागातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत होता. मात्र गेल्या १० दिवसांपासून बंद असलेल्या कारखान्यांमुळे नागरीकांनाही आता मोकळा श्वास घेता येत आहे.