|| सागर नरेकर

प्रभाग आरक्षणाच्या चक्राकार पद्धतीमुळे नगरसेवक सावध

बदलापूर : अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पुढच्या आठवडय़ात होणाऱ्या प्रभाग आरक्षणाच्या सोडतीपूर्वीच अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रभाग आरक्षणाचा अंदाज आल्याने अनेक बडय़ा लोकप्रतिनिधींनी स्वत:साठी सुरक्षित प्रभागाची शोधाशोध सुरू केली आहे.

सध्याच्या प्रभागाच्या आसपासच्या आणि निवडून येण्याच्या निकषावर हा प्रभाग निवडला जात असून गेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच सभागृहात पाऊल ठेवणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागावर या बडय़ा नगरसेवकांचा डोळा ठेवला आहे. त्यामुळे नवखे नगरसेवकही चिंतेत पडले आहेत.

अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापूर्वी १८ फेब्रुवारी रोजी प्रभाग आरक्षण सोडत पालिकेत पार पडणार आहे. दोन्ही नगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती, जमातीच्या सदस्यांसाठी आरक्षित प्रभाग, नागरिकांचा मागास प्रवर्गातील प्रभाग, महिलांसाठी आरक्षित आणि सर्वसाधारण प्रभाग यांची निश्चिती या सोडतीनंतर होईल. मात्र निवडणूक आयोगाच्या निकषानुसार अस्तित्वात असलेल्या बहुतांश प्रभागाचे आरक्षण बदलण्याची शक्यता आहे. जे प्रभाग गेल्या निवडणुकीत आरक्षित होते, ते प्रभाग खुले होण्याची दाट शक्यता आहे. त्यातही अनुसूचित जाती आणि जमातीचे प्रभाग हे त्या प्रभागात असलेल्या जातीनिहाय मतदारांच्या संख्येवर अवलंबून असतात. गेल्या निवडणुकीत अंबरनाथ नगरपालिकेच्या एकूण ५७ प्रभागांपैकी ८ प्रभाग तर कुळगाव-बदलापूर नगरपालिकेतील एकूण ४७  पैकी ७ प्रभाग अनुसूचित जातीचे आहेत. त्या वेळी दोन्ही नगरपालिकांमध्ये अनुसूचित जाती, जमातीच्या मतदारांची संख्या ज्या प्रभागात अधिक होती, त्यानुसार हे प्रभाग आरक्षित करण्यात आले होते. मात्र, नव्या रचनेत हे प्रभागाचे क्षेत्र बदलणार असल्यामुळे त्यांचे आरक्षणही जाणार आहे. तर लोकसंख्येनुसार सध्याच्या आरक्षित प्रभागांपुढील प्रभाग चक्राकार पद्धतीने आरक्षित होतील अशी शक्यता आहे. असाच निकष महिला आणि सर्वासाठी खुला या प्रभागांसाठीही लागू पडणार आहे. सध्याचे महिला प्रभाग सर्वासाठी खुले, तर खुले प्रभाग महिलांसाठी आरक्षित होण्याची दाट शक्यता आहे. या आरक्षित होणाऱ्या प्रभागांचा अंदाज आल्याने त्या प्रभागातील बडय़ा नगरसेवकांनी आता सुरक्षित प्रभागाची शोधाशोध सुरू आहे.

यात अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सर्वपक्षीय बडय़ा विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या नगरसेवकांनी आपल्या शेजारच्याच आणि निवडून येण्याची शक्यता असलेल्या प्रभागांवर आपला डोळा ठेवला आहे.

नवख्या नगरसेवकांत अस्वस्थता

गेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच सभागृहात प्रवेश केलेल्या नवख्या नगरसेवकांच्या प्रभागावर या बडय़ा नगरसेवकांनी लक्ष केंद्रित केल्याने त्यांच्यातही अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे येत्या १८ फेब्रुवारी रोजीच्या सोडतीच्या आधीच आपले प्रभाग सुरक्षित करण्यासाठी नगरसेवकांच्या पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे कळते आहे. यामुळे नवखे नगरसेवक मात्र चिंतेत आहेत.