मजूर तसेच सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सुविधा देण्यासाठी प्रयत्न

ठाणे : परदेशातून परतणाऱ्या नागरिकांना १४ दिवसांचे खासगी हॉटेलांमधील सक्तीचे अलगीकरण भलतेच महाग ठरू लागल्याने ठाणे जिल्हा प्रशासनाने अशा प्रवाशांना स्वस्त हॉटेलचा पर्याय मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परदेशातून आणि विशेषत: बांगलादेशातून येत्या दोन दिवसांत मजूर, कामगारांचा एक मोठा वर्ग ठाण्यात येणार आहे. महागडय़ा हॉटेलांच्या पर्यायांविषयी अनेक प्रवाशांकडून याआधीच नाराजीचा सूर उमटत असताना स्वस्त अलगीकरणाचा नवा पर्याय शोधला जात आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारतर्फे ५ मेपासून परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना विशेष विमानाने परत आणण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. परदेशातून परतलेल्या या नागरिकांना सक्तीच्या विलगीकरणात जावे लागत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्य सरकारने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था ते वास्तव्यास असणाऱ्या जिल्ह्याच्या मुख्य शहरातील हॉटेलमध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबई, ठाणे जिल्हा प्रशासनाने परदेशातून परतलेल्या प्रवाशांच्या अलगीकरणाची व्यवस्था शहरांमध्ये केली. परदेशातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनाने ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावर असलेल्या दोन हॉटेलांमधील खोल्या राखीव ठेवल्या आहेत.

याठिकाणी ५० नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या खासगी हॉटेलांमध्ये १४ दिवस अलगीकरणात राहण्यासाठी ७५ हजारांहून अधिकचा खर्च आहे. त्यामुळे परदेशातून परतलेल्या अनेक नागरिकांनी तसेच काही विद्यार्थ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. परदेशातून परतलेल्या काही प्रवाशांचे ठाणे तसेच जिल्ह्यातील शहरांत मोठी निवासस्थाने आहेत. तेथे अलगीकरण शक्य आहे, असेही यापैकी काहींचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या सूचनानुसार हॉटेलांमधील हे सशुल्क अलगीकरण बंधनकारक असल्याने अशांनाही यातून सूट दिली जात नाही. अलगीकरणात राहण्यासाठीच्या खर्चाची ५० टक्के रक्कम आगाऊ भरावी लागत असल्याने परदेशातून परतल्यावर तात्काळ पैसे उभे करतानाही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परदेशातून परतणाऱ्या नागरिकांचा हा आर्थिक भुर्दंड कमी करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.

परदेशातून परतणाऱ्या या नागरिकांमध्ये काही विद्यार्थी, बांधकाम मजूर, तसेच उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येकालाच हा खर्च परवडणारा नाही. अशा नागरिकांसाठी दिवसाचा राहण्याचा खर्च ७०० ते एक हजार रुपये असणाऱ्या हॉटेलांचा शोध घेतला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

परदेशातून परतलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील नागरिकांची ठाणे शहरातील दोन हॉटेलांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. ही दोन्ही हॉटेल पूर्ण भरल्यानंतर याहून आणखी स्वस्त हॉटेल परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी सज्ज ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे.

– अविनाश शिंदे, प्रांत अधिकारी, ठाणे