04 July 2020

News Flash

मेट्रो कामांसाठी भूमिपुत्रांचा शोध

परप्रांतीय मजूर मूळगावी परतल्याने मनुष्यबळ तुटवडा

(संग्रहित छायाचित्र)

परप्रांतीय मजूर मूळगावी परतल्याने मनुष्यबळ तुटवडा

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : मजुरांच्या तुटवडय़ामुळे मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो प्रकल्पांची कामे मंदावली असल्याने या कामांचा वेग पूर्ववत व्हावा यासाठी प्राधिकरणाने राज्य सरकारच्या मदतीने आता राज्यातील वेगवेगळ्या भागांमधून मजुरांचा शोध सुरू केला आहे. राज्यातील ग्रामीण तसेच अर्धनागरी पट्टय़ात हाताला काम नसलेले कामगार, मजूर यांची एक यादी तयार केली जात असून पुढील काही दिवसांत या बेकारांना मेट्रो कामासाठी जुंपण्याची तयारी सुरू आहे.

टाळेबंदीच्या काळातही मेट्रोची कामे सुरू राहावीत यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने सुमारे साडेपाच हजार परप्रांतीय मजुरांची विविध ठिकाणी छावण्या उभारून राहण्याची सोय केली होती. केंद्र आणि राज्य सरकारने परप्रांतीय मजुरांना प्रवासासाठी मुभा दिल्याने यापैकी निम्म्याहून अधिक मजुरांनी त्यांचा गावाचा रस्ता धरला. त्यामुळे मुंबई, ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरातील मेट्रोची कामे मंदावली आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांवर काम करणाऱ्या मजुरांचे स्थलांतर थांबवण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले. महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या ९ मेट्रो प्रकल्पांवर काम करणाऱ्या साडेपाच हजार परप्रांतीय मजुरांची प्राधिकरणाने मुंबई आणि ठाण्यात विविध ठिकाणी छावण्या उभारून राहण्याची सोय केली होती. या छावण्यांमध्ये मजुरांसाठी जेवणाची व्यवस्थाही केली जात होती. डॉक्टरांच्या माध्यमातून या मजुरांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात येत होती. तसेच या कामगारांना लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा करण्याचेही नियोजन आखण्यात आले होते. टाळेबंदीच्या काळात कामगारांच्या देखभालीवर होणारा हा सर्व खर्च एमएमआरडीएच्या विविध कंत्राटदाराकडून करण्यात येत होता. या खर्चाची परतफेड एमएमआरडीएकडून करण्यात येणार होती. पुरेशा प्रमाणात कामगार उपलब्ध असल्याने प्राधिकरणाने २० एप्रिलपासून मुंबई, ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरातील ९ मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू केली होती. मात्र, मे महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारने टाळेबंदीच्या काळात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी प्रवास करण्यासाठी मुभा दिल्याने आणि श्रमिकांसाठी विशेष रेल्वे तसेच बसेस सोडल्यामुळे मेट्रो प्रकल्पांवर काम करणारे निम्म्याहून अधिक मजूर त्यांच्या मूळगावी परतले आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्पांच्या कामाचा वेग काही प्रमाणात मंदावला असून ही कामे वेगाने सुरू करण्यासाठी नव्या मजुरांचा शोध प्राधिकरणाने सुरू केला. यासाठी राज्यातील विदर्भ आणि मराठवाडय़ातील मराठी मजुरांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्यामुळे सध्या राज्यातील मजुरांचा शोध घेण्याचे मोठे आवाहन प्राधिकरणासमोर आहे.

मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष

टाळेबंदीच्या काळात ९ मेट्रो मार्गावर काम करणाऱ्या अनेक अकुशल कामगारांनी घरचा रस्ता धरला आहे. असे असले तरी सध्या उपलब्ध असलेल्या कुशल कामगारांतर्फे मेट्रो प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यात येत आहेत. याबाबतची माहिती प्राधिकरणातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामांसाठी प्राधान्याने राज्यातील मजुरांची नेमणूक करण्याकडे आणि मेट्रोची कामे वेगाने सुरू करण्यात मुख्यमंत्री विशेष लक्ष घालत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 2:36 am

Web Title: search for local workers for metro work zws 70
Next Stories
1 अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नोटिसा
2 उल्हासनगरातील बाजारपेठा खुल्या होणार
3 धर्मगुरूच्या वाढदिवसामुळे भक्तांना करोनाबाधा
Just Now!
X