लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हैराण; प्रतिकारशक्ती वाढविण्याचा सल्ला
कधी थंडी, तर कधी उन्हाचा उकाडा अशा हवामानाच्या लहरीपणामुळे नागरिक बेजार झाले आहेत. हवामानातील या बदलांमुळे सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी आदी आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली असून त्याचा सगळ्यात मोठा फटका लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.
शहरातील तापमानात दर आठ-दहा दिवसांनी बदल होत आहे. रात्री व पहाटे कडाक्याची थंडी तर दुपारी अंगाची लाही लाही करणारी उष्णता असे विषम वातावरण आहे. हवामानातील या बदलांमुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून खाजगी दवाखान्यात रुग्णांची रिघ लागलेली पाहावयास मिळते. त्यामध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. हवामानातील हे बदल उपरोक्त आजारांना कारणीभूत ठरत असून प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लहान मुलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना याची लागण पटकन होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. खाजगी दवाखान्यांमध्ये कांजण्या, सर्दी खोकला, अंगदुखी अशा अनेक आजारांनी ग्रासलेल्यांची रांग लागली आहे.
डॉ. उदय थोरात म्हणाले, थंडी गेल्यानंतर तापमानात वाढ झाल्याने कांजण्यांची साथ आली आहे. तसेच थंडी आणि दुपारी जाणवणारे ऊन या हवामान बदलामुळे साथीचा ताप येण्याचे प्रमाण वाढले असून अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी-खोकला, घसा खवखवणे अशा तक्रारींतही वाढ झाली आहे. कमी प्रतिकारशक्ती असणाऱ्यांना या बदलाशी पटकन जुळवून घेता येत नाही. परिणामी आजार बळावले आहेत. सर्दी-खोकला, अंगदुखी अशा तक्रारी तीन ते पाच दिवस रहातात. योग्य औषधोपचाराने हे साथीचे आजार आटोक्यात येत असून कोणालाही अशी लक्षणे जाणवल्यास दुखणे अंगावर काढू नका. डॉक्टरांचा सल्ला लगेच घेऊन बरे व्हा, कारण साथीचे आजार हे आपल्यामुळे दुसऱ्यांनाही होऊ शकतात. तसेच प्रतिकारशक्ती वाढविणारी फळे खाण्याचा सल्लाही डॉक्टर देत आहेत.
एरवी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी उन्हाळ्याचे चटके जाणवू लागतात. मात्र यंदा फेब्रुवारी संपत आला तरी पहाटेची थंडी कमी झालेली नाही. सर्दी-खोकला, ताप या आजाराने मुले आजारी आहेत. त्यात त्यांची सहनशक्ती कमी असल्याने बदलांचा परिणाम त्यांच्यावर लगेच जाणवतो. ज्येष्ठ नागरिकांच्या श्वसनक्रियेवर परिणाम होत आहे असे डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.