शहर शेती
आपल्यापैकी अनेकांचे सेकंड होम असते. हे सेकंड होम चांगली गुंतवणूक म्हणून प्रामुख्याने घेतलेले असते. उत्पन्न मिळवण्याकरिता ते लीव्ह लायसन्सवर भाडय़ाने दिलेले असते. यामधून त्या घराचा देखभाल खर्च करून ते चांगल्या स्थितीत ठेवले जाते. सेकंड होमप्रमाणेच अनेकांनी शेतजमीनसुद्धा घेतलेली असते. या जमिनी उद्या वाढणाऱ्या नागरीकरणाच्या, विकासाच्या टापूत घेतलेल्या असतात. त्याचबरोबर आपली शेती करण्याची हौस भागावी, निसर्गाच्या सान्निध्यात राहता यावे, पर्यावरण जाणीव जागृत झाल्यावर पर्यावरण सुधारण्यात आपला खारीचा वाटा असावा या हेतूने गुंतवणूक म्हणून जागा घेतलेल्या असतात. मात्र, अपुरा अनुभव, वेळ आणि दिखाऊपणाला भुलून घेतलेल्या लागवडीबाबतच्या निर्णयांमुळे अशा शेतजमिनी बऱ्याचदा पडीक राहतात.
ज्या लोकांनी आपल्या शेतीच्या हौसेपोटी जागा घेतलेली असते त्यांना त्यासाठी योग्य तेवढा वेळ देता येत नाही. सुरुवातीला शेतीत केलेली गुंतवणूक आपल्याला काही दिवसांनी त्याच्या पटीत परत मिळेल, अशी मानसिकता त्यात असते. ती योग्यच असते, पण आपण बांधावर बसून किंवा शहरात राहून आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जाऊन शेती होत नाही. कृषी उत्पादन घेताना आपण त्याकडे कायम ग्राहक या नजरेने पाहत असतो. आपण वायफळ केलेला खर्च त्या कृषी उत्पादनामधून निघत नाही. अनेकांना वेगवेगळ्या कंपन्यांनी मार्केटिंग पॉलिसीमधून असे चित्र उभे केलेले असते, की तुम्ही या प्रकारच्या कृषी उत्पादनासाठी केलेली गुंतवणूक तुम्हाला लाखो रुपये मिळवून देईल. उदा. कोरफड व साग यांसारख्या गुंतवणुकी आपल्या जास्त पैसे मिळविण्याच्या हावेपोटी आपण कंपनीच्या मार्केटिंग पॉलिसीला भुलतो व नको तेथे नको तेवढी गुंतवणूक करतो. त्या प्रकारचे कृषी उत्पादन घेण्यास, आवश्यक असलेले ज्ञान आपणास नसते. यामुळे आपली फसगत होऊन केलेली गुंतवणूक अक्षरश: वाया जाते आणि आपला शेती करण्याचा उत्साह कमी कमी होत जातो.
या अनेक कारणांनी आपण शहराजवळील गावात घेतलेली जमीन पडीक होते. खरे म्हणजे शहराच्या परिसरात असलेली शेती, त्यात लावलेल्या वेगवेगळ्या वनस्पती, या शेतीमधून घेतली जाऊ शकणारी कृषी उत्पादने ही त्या शहरांची फार मोठी गरज असते. शहरापासून शंभर किमी परिघातून उत्पन्न झालेली उत्पादने जास्त ताजी असल्यामुळे त्यात जीवनसत्त्वाचे प्रमाण चांगले राखले जाते. शहरालगत असलेल्या शेतीमधून होणाऱ्या प्रत्यक्ष फायद्यात आपल्याला लागणारा भाजीपाला व फळे, दूध, मांस, अंडी, मासे इ. अशा आपल्या बऱ्याच गरजा पूर्ण करण्याची त्यात क्षमता असते. आपण आपला ग्राहक गट करून एखाद्या गावातून आपल्या बऱ्याच गरजा पूर्ण करू शकतो. आरोग्यदायी अन्न खाणे आज आपली गरज झाली आहे. त्या गावातील शेतकऱ्यांना आपण कृषीमाल खरेदीची हमी व योग्य तंत्रज्ञान जर पुरविले तर आपण सेंद्रिय पद्धतीने केलेली उत्पादने मिळवू शकतो.
अप्रत्यक्ष फायद्यामध्ये शेती पडीक न राहता लागवडीखाली आल्यामुळे मूलस्थानी जलसंधारण होऊ शकते. त्याचबरोबर शहरातून वाहणारे सांडपाणी योग्य प्रक्रिया करून  त्या पाण्याचा पुनर्वापर शेतीसाठी करणे सहजशक्य आहे. आपल्या शहराचे व भोवतालचे पर्यावरण सुधारण्यास, ग्लोबल वॉर्मिग कमी करण्यास या शेतीचा फार उपयोग असतो. आपण आपली शेती पडीक ठेवून खरे म्हणजे आपलेच नुकसान करून घेत असतो. जसे आपण सेकंड होम भाडय़ाने देतो तसे आपण होतकरू तरुणांना शेती भाडय़ाने देऊन शेती चांगली ठेवण्याबरोबरच, जलसंधारण, पर्यावरण चांगले राखण्यास हातभार लावू शकतो.अनेकांना शेती करण्याची इच्छा असते, परंतु त्यांच्याकडे जमीन नसते. गुंतवणूक करण्यास पैसे नसतात, अशांना या शेतीमध्ये सहभागी करून आपण कराराने शेती देऊन परतावा मिळवू शकतो. शेती प्रशिक्षण घेतलेल्या अनेक तरुणांना शेती करण्याची इच्छा असते, पर्यावरणासाठी काम करण्याची इच्छा असते. या गटांना, तरुणांना आपण आपली जमीन देऊन स्वार्थाबरोबर परमार्थ साधू शकतो.आपल्या मनामध्ये आपली जमीन जर कराराने दिली तर घेणारा त्या जागेवर कूळ म्हणून लागेल व वहिवाट होऊन कालांतराने जमिनीचा मालक होऊ शकेल ही भीती असते. पण जसे आपण आपला फ्लॅट ठरावीक मुदतीकरिता लीव्ह लायसन्सने देतो तशी जमीन ठरावीक मुदतीसाठी कराराने देऊन त्याचे स्टम्पपेपरवर अ‍ॅग्रीमेंट करून ते रजिस्टर करू शकतो.मातीची योग्य प्रकारे मशागत केल्यावर व त्यात कृषी उत्पादने घेण्यासाठी सेंद्रिय खते वापरल्याने जमिनीची जलधारणाशक्ती वाढते. पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब मातीत जिरण्याची क्षमता वाढते. म्हणजेच पर्यायाने आपल्या परिसरातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होते. म्हणजे हा प्रत्यक्ष फायदा आहे. कारण आपण चांगले पाणी तयार करू शकत नाही. अशा प्रकारे कराराने जमीन घेऊन वांगणी, बदलापूरच्या परिसरात शेती होत आहे. वांगणीचे तरुण, उत्साही, अभ्यासू गणेश देशमुख गेली काही वर्षे कराराने शेती घेऊन त्यात भाजीपाला उत्पादन घेत आहेत. त्यामुळे परिसरातील २५ ते ३० जणांना वर्षभर रोजगार निर्माण झाला आहे आणि उत्तम प्रकारची आरोग्यदायी कलिंगड, टॉमेटो, काकडी, वांगी यांसारखी पिके जवळच्या शहरातील मॉलमध्ये विक्री केली जातात. त्यांच्याकडून
प्रेरणा घेऊन अनेक जण कराराने शेती करत आहेत आणि अनेक जण जमीन कराराने देण्यास उत्सुक आहेत. बदलापूर परिसरातील कोंडेश्वरजवळील बेडशीळ गावात एम.बी.ए. झालेली आशीष, जयेशसारखी तरुण मुले कराराने शेती घेऊन भेंडीपासून तांदळापर्यंत उत्पादन घेत आहेत.पुण्यात तर कॉलेजमधील मुलांमध्ये गेली चार वर्षे ‘एक दिवस शेतीकरता’ ही कल्पना रुजली आहे. मावळ प्रांतात हजारो मुले एक दिवस भात लावण्यास शेतकऱ्यांच्या मदतीला जातात, त्यामुळे भातलावणीचा खर्च थोडा कमी होण्यास शेतकऱ्याला मदत होते व जमीन पडीक न राहता लागवडीखाली येते. अशाच नवीन संकल्पना राबवल्या गेल्या तर शेतीलाही सुदिन येतील हे नक्की!