ठाण्यातील एक हजार सोसायटय़ांमध्ये कलश उपलब्ध
क्षेपणभूमीच्या समस्येवर उपाय ठरणारी विकेंद्रित घनकचरा व्यवस्थापनाची चळवळ पुढे नेण्यासाठी सुरू करण्यात आलेला शहरातील निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्प आता अधिक विस्तारला जाणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात शहरातील तब्बल एक हजार सोसायटय़ांमध्ये निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत. समर्थ भारत व्यासपीठ आणि महापालिकेचा प्रदूषण नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविला जात आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर १० सोसायटय़ांमध्ये निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत.
समर्थ भारत व्यासपीठाने राबविलेल्या या उपक्रमात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचे चांगले परिणामही दिसून आले. संस्थेच्या कोपरी विभागातील निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्पाला नुकताच स्कॉच अवॉर्ड ऑफ मेरिटच्या रूपाने राष्ट्रीय स्वरूपाचा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्याचा निर्णय समर्थ भारत व्यासपीठ संस्थेने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मंदिर, स्मशानभूमी आणि फूल बाजार येथील निर्माल्य संकलन केले जात होते. आता दुसऱ्या टप्प्यात सोसायटय़ांमधील निर्माल्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आतापर्यंत ठाण्यातील १० निवडक सोसायटींमध्ये प्रायोगिक तत्त्वावर निर्माल्य कलशाची स्थापना करून त्या माध्यमातून तीन हजार घरांतील निर्माल्य संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या वर्षभरात किमान एक हजार सोसायटय़ांमध्ये निर्माल्य कलश ठेवून एक लाख घरांतील निर्माल्य संकलित करण्याचे उद्दिष्ट आहे.
गणेशोत्सव काळात विसर्जन घाटावर येणारे निर्माल्य तलाव व खाडीत विसर्जित होत असल्याने मोठय़ा प्रमाणावर जलप्रदूषण होत असे. त्यावर उपाय म्हणून सात वर्षांपूर्वी समर्थ भारत व्यासपीठाने ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण कक्षासोबत निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्प सुरू केला.
विसर्जन घाटावरच भाविकांकडून निर्माल्य संकलित करणे, तिथेच त्याचे जैविक व अजैविक असे वर्गीकरण करणे आणि त्यापासून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार करण्याचा उपक्रम सुरू झाला.
गेल्या सात वर्षांत या उपक्रमाने मोठी मजल मारली. केवळ गणेशोत्सवापुरता हा उपक्रम मर्यादित राहिला नाही. शहरातील २० मंदिरे, १७ स्मशानभूमी, एक फूल बाजार आदी ठिकाणांना निर्माल्य संकलन केंद्राची जोड देण्यात आली. त्यामुळे वर्षभर दररोज साधारण दोन ते तीन टन निर्माल्य संकलित होऊ लागले आहे.
दरम्यान, शहरातील या निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्पाला प्रतिष्ठेचा असा स्कॉच अवॉर्ड ऑफ मेरिट जाहीर झाला आणि या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. येत्या २३ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

येथे आहेत निर्माल्य कलश
चरई येथील गीता सोसायटी, वृंदावन सोसायटी, उथळसर येथील विकास कॉम्प्लेक्स, कोलशेत येथील एव्हरेस्ट वर्ल्ड, घोडबंदर रोडवरील कांचनपुष्प सोसायटी, चंदनवाडी येथील प्रेस्टीज गार्डन, राबोडीजवळील साकेत कॉम्प्लेक्स, लुईसवाडी येथील मैत्री टॉवर, पारसिकनगर, खारेगांवजवळील मैत्री वाटिका, खोपट येथील सेंट्रल बँक कॉलनी आदी १० ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत.