18 January 2019

News Flash

ठाणे जिल्हा रुग्णालयात रक्षकाकडून चिमुरडीवर अत्याचार

एका पहारेकऱ्याने सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत गुरुवारी दुपारी एका पहारेकऱ्याने सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. आरोपी हरीश नरवार (वय ५२) याला पोलिसांनी अटक केली आहे.

या रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका महिलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. पतीसह त्यांची सहा वर्षांची मुलगी आईला भेटायला म्हणून रुग्णालयात आली होती. त्यावेळी पाणी पिण्यासाठी म्हणून ती तळमजल्यावर गेली असता तिथे तैनात असलेला नरवार याने या मुलीला एका रिकाम्या खोलीत नेले आणि तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून ती सुटून वडिलांकडे आली. तिच्या गालावर आणि अंगावर जखमा पाहून आणि घडलेला प्रकार तिच्याकडून ऐकल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. व्ही. धर्माधिकारी यांनी दिली. यापूर्वी आरोपीविरुद्ध अशा प्रकारचे काही गुन्हे दाखल आहेत काय याची माहितीही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून मागविण्यात आली आहे.

First Published on May 12, 2018 2:19 am

Web Title: security guard arrested for sexual assault on minor girl in thane district hospital