व्यापाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे काही भागांत दुकाने बंद

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शहरात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने जाहीर करण्यापूर्वीच शहराच्या काही भागांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेऊन सोमवारपासून टाळेबंदीची  अंमलबजावणी सुरू केली आहे. कापूरबावडी, कासारवडवली, मानपाडा, ओवळा, वाघबीळ, ढोकाळी, कोलशेत, बाळकूम आणि कोपरीतील काही परिसरात स्वयंघोषित टाळेबंदी करण्यात आली असून त्यास व्यापाऱ्यांनीही पाठिंबा देऊन दुकाने बंद ठेवल्याचे चित्र दिसून आले.

राज्य शासनाने टाळेबंदी शिथिल केल्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने सुरू झाली होती, तर रुग्ण आढळून येणाऱ्या म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध कायम होते. असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली असून शहरात दररोज तीनशेहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. शहराच्या सर्वच भागात रुग्ण वाढत असले तरी त्या तुलनेत नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला होता. या संदर्भात पालिका आणि पोलिसांच्या बैठकाही सुरू झाल्या होत्या. मात्र, टाळेबंदीचा अंतिम निर्णय येण्याआधीच काही ठिकाणी लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी एकत्रित बैठक घेऊन स्वयंघोषित टाळेबंदीची घोषणा केली होती. त्यामध्ये कापूरबावडी, कासारवडवली, मानपाडा, ओवळा, वाघबीळ, ढोकाळी, कोलशेत, बाळकूम भागाचा समावेश होता.

या टाळेबंदीत दूध, औषधालये आणि रुग्णालये सुरू राहणार असून जीवनावश्यक वस्तूंची तसेच इतर दुकाने बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या संदर्भात समाजमाध्यमांद्वारे आणि परिसरात फलकांद्वारे जनजागृती करण्यात येत होती. त्यानुसार सोमवारी सकाळी या भागातील दुकानदारांनी आणि नागरिकांनी टाळेबंदीला प्रतिसाद दिल्याने या भागात शुकशुकाट होता.

नागरिकांची धावपळ

या सर्वच भागात सकाळी आणि रात्रीच्या वेळी भाजीपाला तसेच फळांच्या गाडय़ा उभ्या असतात. मात्र, सोमवारी सकाळी एकही विक्रेता या परिसरात फिरकला नाही. तर, किराणा मालाची दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. कोलशेत येथील डीमार्ट ही बंद करण्यात आले होते. या डीमार्टच्या परिसरात येऊन नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत होते. त्यामुळे शहराच्या इतर भागातून याठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची धावपळ झाली.