शाखाप्रमुख मारहाण प्रकरणानंतर महिला पोलिसांना स्वसंरक्षणाचे धडे

‘‘रस्त्यावर वाहतूक नियमन करत असताना कोणी गणवेशाची कॉलर पकडली तर त्याच्यावर तात्काळ प्रतिहल्ला चढवा’’.. ‘‘विनयभंगाचा प्रयत्न करणाऱ्याला तिथल्या तिथेच निष्क्रिय करून टाका’’.. ‘‘अंगावर हात टाकणाऱ्याला चोख प्रत्युत्तर देऊन स्वत:चे रक्षण करा’’.. ‘‘आपल्या मदतीला कोणी येईल याची अपेक्षा करण्यापेक्षा आपणच कोणत्याही घटनेचा यशस्वी सामना करू शकतो असा आत्मविश्वास स्वत:मध्ये निर्माण करा’’.. जागतिक महिला दिनानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम सुरू असताना ठाणे वाहतूक शाखेच्या मुख्यालयात महिला पोलिसांसाठी ‘स्वयंसिद्धा’ हे स्वसंरक्षणाच्या क्लृप्त्या सांगणारे शिबीर सुरू होते. महिला वाहतूक पोलीस कर्मचारीला झालेल्या मारहाणीच्या पाश्र्वभूमीवर वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. ठाण्यातील नितीन कंपनी उड्डाणपुलाखाली वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यास शिवसेनेच्या शाखाप्रमुखाने मारहाण केली होती. या घटनेवर समाजातील सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र अशा गोष्टींना घाबरण्यापेक्षा या गोष्टींमधून बोध घेऊन येणाऱ्या प्रत्येक संकटाला महिला कर्मचाऱ्यांनी तोंड देण्याची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. डोंबिवलीतील लीना मॅथ्यू यांनी या शिबिरामध्ये महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. गेल्या १७ वर्षांपासून त्या हा उपक्रम राबवत असून ज्युडोची राष्ट्रीय खेळाडू पूर्वा मॅथ्यू आणि आशुतोष लोकरे यांनी हे प्रशिक्षण या वेळी पोलीस महिलांना दिले. त्यांनी बचावाचे आणि हल्ल्याचे वेगवेगळे प्रकार यामध्ये प्रात्यक्षिकासह दाखवून दिले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा स्वत:ची सुटका करता येईल असे प्रशिक्षण ‘स्वयंसिद्धा’ उपक्रमाच्या माध्यमातून दिले जाते. कोणत्याही वयातील महिलांना हे प्रशिक्षण उपयुक्त ठरते. ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असून त्यांना वाहतूक नियमन करताना आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी याचा फायदा होऊ शकेल. ‘स्वयंसिद्धा’ या उपक्रमाच्या माध्यमातून यापूर्वी नोकरदार महिला, आदिवासी महिलांनी प्रशिक्षण घेतले असून पोलीस महिलांनाही त्याचा लाभ घेता येणार आहे. ज्युडो, कराटे, तायक्वॉन्डो आणि यांसारख्या खेळांचे मिश्रण या प्रशिक्षणामध्ये करून त्यातील चांगले प्रकार महिलांना शिकवण्यात आले आहेत.

– लीना मॅथ्यू,  स्वयंसिद्धा प्रशिक्षक

ठाणे पोलिसांच्या वतीने आयोजित या शिबिरामध्ये शंभरहून अधिक महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. या वेळी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांच्या हस्ते पोलीस दलातील चांगली कामगिरी करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विशाखा कमिटीच्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती या वेळी करून देण्यात आली. महिला पोलिसांना शारीरिक आणि कायदेशीरदृष्टय़ा सक्षम करणारा हा दिवस ठरला आहे. ‘स्वयंसिद्धा’ हा उपक्रम पुढील काळातही महिलांसाठी मार्गदर्शक ठरेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

– रश्मी करंदीकर,  उपायुक्त ठाणे पोलीस