News Flash

शाळेच्या बाकावरून : विशेष मुलांना स्वावलंबनाचे धडे

विशेष मुलांना स्वावलंबी व समाजोपयोगी बनवण्याचे आणि मुख्य समाजप्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट साध्य करता येते.

जेव्हा एखाद्या घरात नवीन बाळ जन्माला येते तेव्हा किंवा खरे तर त्याच्या आधीपासूनच त्याला घडवण्याचे, त्याला शिकवून मोठे करण्याचे स्वप्न पाहतात, त्यासाठी प्रयत्नशील राहतात; पण जेव्हा विशेष मूल जन्माला येते तेव्हा मात्र पालक पूर्णपणे उद्ध्वस्त होतात. अपत्याच्या मतिमंदत्वाचा स्वीकार करून वास्तवाला सामोरे जाणे आणि त्वरित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मुलाचा विकास घडवण्याच्या दृष्टीने प्रारंभ करणे हे खरोखरच पालकांना खूप अवघड जाते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपचार पद्धतींच्या साहाय्याने, विशेष शाळेतील शिक्षणाद्वारे, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास या मुलांमध्ये त्यांच्या मर्यादेपर्यंत विकास घडवून आणणे शक्य होते. अशा प्रयत्नांमधूनच विशेष मुलांना स्वावलंबी व समाजोपयोगी बनवण्याचे आणि मुख्य समाजप्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट साध्य करता येते.
पण या सगळ्या वाटचालीत पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते, कारण विशेष मुलाला बरोबर घेऊन वाटचाल करणे हा एक संघर्षच असतो. पालकांची मानसिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक अशा सर्व पातळ्यांवर कसोटी असते. अथक परिश्रमानंतर मिळणारे यश हे तुलनेने मर्यादित असते. त्यामुळे आज विशेष मुलांचे विकसन, शिक्षण, स्वावलंबन, स्वयंरोजगार इ.पासून वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. परिणामी बऱ्याचदा विशेष मुलाकडे एक ओझे म्हणून पाहिले जाते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही; पण या मुलांमध्येही काही क्षमता, कौशल्ये असतात. लहानपणापासून जागरूकपणे प्रयत्न केल्यास, तूही करू शकतोस, हा आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार देऊ केल्यास, प्रोत्साहन देत राहिल्यास (त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन) दिलेल्या संधीचे ते चीज करतात हे दिसून येते. नाण्याची ही दुसरी बाजू लक्षात घेऊन काही विशेष शाळा, पालक संघटना, संस्था जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत, जेणेकरून ही मुले आत्मनिर्भर होतील. त्यांना रोजगाराची संधी प्राप्त होईल आणि ती आत्मसन्मानाने जगताना समाजाचा एक घटक म्हणून पाहिली जातील.
बंगलोरस्थित अम्बा फाऊंडेशन आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर द मेंटली हँडिकॅपड्, सिकंदराबाद या संस्था अनुक्रमे संगणक प्रशिक्षण आणि क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम प्रशिक्षणाच्या माध्यमातून विशेष मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यरत आहेत. विशेष मुलांची बलस्थाने, त्यांच्या क्षमता, त्यांची एखादी गोष्ट शिकण्याची प्रक्रिया लक्षात घेऊन प्रशिक्षणाचा आराखडा या संस्थांनी प्रयत्नपूर्वक तयार केला आहे. ठाण्यातील जागृती पालक संघटनेतर्फे या दोन संस्थांतर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती विशेष मुलांच्या पालकांना आणि विशेष शाळा व संस्थांना व्हावी म्हणून एक कार्यशाळा आयोजिण्यात आली होती. उमा निळकंठ व्यायामशाळेतील या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात अम्बा फाऊंडेशनतर्फे सौम्या संजय यांनी मार्गदर्शन केले, तर दुपारच्या सत्रात एनआयएमएचतर्फे मौसमी भौमिक यांनी मार्गदर्शन केले.
अम्बातर्फे जो संगणक प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो त्याचे अंतिम उद्दिष्ट प्रशिक्षणार्थीना डाटा इंट्रीचे काम करता यावे, जेणेकरून त्यांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. संस्थेची भिन्नमती प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देणारी १९६ केंद्रे १८ राज्यांमध्ये कार्यरत आहेत. ज्यांचा बुद्धय़ांक ६५ पेक्षा कमी आहे अशा भिन्नमती मुलांना हे प्रशिक्षण बंगलोर येथे दिले जाते. तेथे समवयस्क इतर मुले प्रशिक्षण घेताना जवळून पाहिल्यावर या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांच्याबरोबर गेलेल्या विशेष शिक्षक (किंवा पालक) यांच्यामध्येदेखील ही मुले करू शकतील हा विश्वास वृद्धिंगत व्हायला, सकारात्मक दृष्टी निर्माण होण्यास साहाय्य होते. इच्छुक संस्थेतर्फे २ मुले आणि एक विशेष शिक्षक यांना या प्रशिक्षणासाठी पाठवता येते. बंगलोर येथील संस्थेत ६ दिवसांचा हा प्रशिक्षण कालावधी (१० ते ५ वेळेत) असतो आणि तेथील संपूर्ण राहण्याचा सर्व खर्च अम्बातर्फे केला जातो. बंगलोरला जो गट पाठवला जातो त्यामधील मुलांची दोन गटांत विभागणी केली जाते. (उच्च आणि मध्यम क्षमता). उच्च क्षमता असलेला स्वत: शिकतो आणि मग आपल्या सहकाऱ्याला शिकवतो. त्यामुळे त्याचाही सराव होतो. गट शिकून आल्यावर स्वत:च्या संस्थेमधील समवयस्क मित्रांना शिकवतील, कारण प्रशिक्षणानंतर खंड न पडता सराव होणे गरजेचे असते. संस्था त्यासाठी २० मुलांची निवड करेल. पुन्हा उच्च आणि मध्यम कार्यक्षमता असलेल्या मुलांचे (१० प्रत्येक गटात) असे दोन गट होतील आणि उच्च क्षमता असलेली १० मुले इतर १० मुलांना शिकण्यास साहाय्य करतील आणि शिकवतील. अशा तऱ्हेने जो गटाचे नेतृत्व करतो त्याची समाज, आकलन, एकाग्रता वाढायला या प्रक्रियेमुळे मदत होते. आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणही वाढीला लागतो. अशा साखळी पद्धतीने ही मुले समवयस्क सहकाऱ्यांबरोबर परस्पर सहकार्याने एकमेकांना सांभाळून घेऊन अधिक परिणामकारकरीत्या शिकतात असे सिद्ध झाले आहे.
प्रशिक्षण घेऊन आल्यावर जर काही अडचणी जाणवल्या तर त्यांच्या वेबसाइटवर त्या दृष्टीने मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्यानंतरही गरज वाटली तर ते जातीने संस्थेत येऊन मार्गदर्शन करतात. इमेज मॅचिंग, पेंट,वर्ल्ड, एक्सल असे टप्प्याटप्प्याने शिकवणारा हा अभ्यासक्रम अम्बाने तयार केला आहे, जो साधारणपणे १०० दिवसांचा आहे. अशा तऱ्हेने प्रशिक्षण घेऊन आल्यावर जर या संस्थेकडे संगणक प्रशिक्षणासाठी आवश्यक ती संपूर्ण व्यवस्था असेल तर त्या शहरातील इतर विशेष मुलांच्या संस्थांनी संपर्क साधावा. अशा तऱ्हेने जास्तीत जास्त विशेष मुलांना याचा लाभ घेता येईल आणि अशा संस्था यानिमित्ताने एकत्र येतील आणि एक नवीन गट तयार होईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर अम्बातर्फे प्रशिक्षणासाठी गेलेल्या चमूला एक लॅपटॉप, शैक्षणिक साधने, मार्गदर्शन साहित्यही देते. प्रशिक्षणार्थीची प्रगती त्यांच्या अपेक्षेनुसार योग्य पद्धतीने होत असेल, त्यांच्या कामाचा दर्जा योग्य असेल, चुकांचे प्रमाण अत्यल्प असेल तर संस्था कामाची संधी उपलब्ध करून देते
अम्बा फाऊंडेशन आणि एन.आय.एम.एच. या संस्था अनुक्रमे संगणक प्रशिक्षण आणि स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम (क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम) या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विशेष/भिन्नमती मुलांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन देण्याचा उपक्रम राबवत आहेत, जेणेकरून विशेष मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, त्यांना आत्मनिर्भर होता येईल आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणणे शक्य होईल. त्यांच्या क्षमता लक्षात घेऊन जर त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला, तर त्या संधीचे ते चीज करतात हे दिसून येते. या संस्थांकडे तशी यशस्वी मुलांची उदाहरणे आहेत. या उपक्रमांची माहिती ठाण्यातील विशेष संस्था/शाळा/कार्यशाळा यांना व्हावी म्हणून एकदिवसीय कार्यशाळा (मोफत) आयोजिण्यात आली होती. अम्बा आणि एनआयएमएचच्या तज्ज्ञांनी यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 4:25 am

Web Title: self dependence lessons to special children
टॅग : Special Children
Next Stories
1 फुलपाखरांच्या जगात : ग्रास ज्वेल
2 शहरबात कल्याण-डोंबिवली : बेकायदा कृत्यांची ‘आधार’भूमी..
3 निमित्त : प्रशासकीय अधिकारी घडविणारे अभ्यास केंद्र
Just Now!
X