प्रकाश लिमये

शमाइल कॉम्प्लेक्स

उच्चविद्याविभूषितांचा निवास असलेले आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेले शमाइल कॉम्प्लेक्स हे संकुल भाईंदर पश्मिच भागातील बालाजीनगर परिसरात आहे. संकुलात ‘अे’, ‘बी-१’, ‘बी-२’ आणि ‘सी’ अशा चार विंग्ज असून ११२ सदनिका, ९ रो हाऊस आणि १२ व्यावसायिक गाळे आहेत. २००३ मध्ये या संकुलाची नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था अस्तित्वात आली.

सोसायटीच्या कार्यकारिणीच्या दर महिन्याला नियमितपणे सभा पार पडतात तसेच वार्षिक सभादेखील मुदतीत पार पडतात. संस्थेचा कारभार चालवताना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याने मीरा-भाईंदर को. ऑप. हाऊसिंग फेडरेशनद्वारा घेण्यात आलेल्या रहिवासी संकुलांच्या स्पर्धेत शमाइल कॉम्प्लेक्सला सवरेत्कृष्ट सोसायटीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संकुलात डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट असे उच्चविद्याविभूषित तसेच व्यापारी वर्गही मोठय़ा प्रमाणात राहतो.

स्वच्छतेबाबत संकुलात विशेष काळजी घेण्यात येते. सफाईच्या कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळा संकुलाची स्वच्छता करण्यात येत असते, परिणामी संकुलात कुठेही कचरा दिसून येत नाही. अनेक संकुलातील सदनिकांचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या उघडय़ावरच असतात, बऱ्याच वेळा त्या गळत असल्याने इमारतींचा दर्शनी भाग खराब होत असतो आणि दिसायलाही ते अत्यंत खराब दिसत असते. शमाईलमध्ये मात्र सांडपाण्याच्या सर्व वाहिन्या बंदिस्त आहेत. बाहेरून या ठिकाणी वाहिन्या असल्याची थोडीदेखील कल्पना येत नाही. जागोजागी वाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी जागा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे इमारत देखील अतिशय नीटनेटकी दिसते.

सुरक्षेच्या दृष्टीने एकंदर ६ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. यातील ३ सुरक्षारक्षक दिवसा आणि ३ सुरक्षारक्षक रात्रपाळीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. संकुलात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद सुरक्षारक्षकांकडून करण्यात येते तसेच इंटरकॉमच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची माहिती सदस्याला देण्यात येत असते. याव्यतिरिक्त संकुलाच्या आवारात १६ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीचे मॉनिटर सोसायटीच्या कार्यालयात तसेच सुरक्षारक्षकांच्या केबिनमध्ये बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सोसायटीत होत असलेल्या घडामोडींवर २४ तास लक्ष  ठेवणे शक्य होते.

पाण्याच्या बाबतीत शमाईल कॉम्प्लेक्स स्वयंपूर्ण आहे. सोसायटीत दोन बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. शिवाय पावासाळ्यात गच्चीवरून येणारे पाणीदेखील या बोअरिंगमध्ये सोडण्यात येत असते. बोअरिंगमधून मिळणारे पाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणाही बसविण्यात आली आहे. त्यामुळे हे पाणी अगदी पिण्यासाठी वापरण्याच्या योग्यतेचे आहे. मात्र या पाण्याची साठवण करण्यासाठी स्वतंत्र टाकी बांधण्यात आली असून त्या पाण्याचा इतर कामासाठीच वापर करण्यात येतो. महापालिकेकडून मिळणारे पाणी पुरेसे तर आहेच, शिवाय महापालिकेचे पाणी चार दिवस आले नाही तरी संकुलाला टँकर मागविण्याची वेळ येत नाही, असे संकुलाचे चेअरमन रमाकांत पोद्दार सांगतात.

सदस्यांची वाहने उभी करण्यासाठी स्टील्ट पार्किंगची सुविधा आहे, तसेच संकुलात मोकळ्या जागाही भरपूर असल्याने उर्वरित वाहने या जागेवर उभ्या करता येतात. दुचाकी, सायकल यांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय आहे. प्रत्येक पार्किंगच्या जागेला क्रमांक देण्यात आले असून दरवर्षी त्याची लॉटरी काढण्यात येते आणि सदस्यांना त्याप्रमाणे पार्किंगची जागा देण्यात येते. पार्किंगसाठी प्रत्येक सदस्याकडून शुल्क घेण्यात येते. प्रत्येक वाहनाला सोसायटीच्या नावाचा स्टीकर लावण्यात आला असून एकही वाहन संकुलाच्या बाहेर उभे करण्यात येत नाही.

सोसायटीत दोन बगिचे असून संकुलाचा परिसर हिरवागार करण्यात आला आहे. यात लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली आहेत. सोसायटीचा कन्वेअन्स करण्यात आला आहे आणि जमिनीचा सातबारा उतारा सोसायटीच्या नावे करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. भोगवटा दाखल्यासह इमारतीची संपूर्ण कागदपत्रे सोसायटीकडे असल्याने कोणत्याही सरकारी कामासाठी सोसायटीला कधीच अडचण येत नसते, अशी माहिती संकुलाचे सचिव आदेश अगरवाल यांनी दिली.

संकुलात गणपती, नवरात्र, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, नववर्ष स्वागत आदी सण समारंभ साजरे केले जातात. बालाजीनगर येथे एकंदर सहा वेगवेगळ्या सोसायटींची मिळून एक स्वतंत्र राखीव जागा आहे. या जागेत नवरात्र मोठय़ा स्तरावर साजरी केली जाते. याशिवाय मुलांसाठी स्पर्धा, आरोग्य आणि रक्तदान शिबीर, अनाथ आश्रमातील मुलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. पावसाळ्यात गच्चीवरून पाणी गळण्याच्या समस्येवर उपाय म्हणून यंदा गच्चीवर पत्र्याची शेड बांधण्यात येणार आहे, तसेच भविष्यात सौरऊर्जा प्रकल्पही बसवण्यात येणार आहे.

संकुलाचे कोषाध्यक्ष मधु असावा असून रवींद्र भोसले, कमलेश चौधरी, हरिश रेबारी, चंद्रहास शिरोडकर, दक्षा किकाणी, आशालता पुजारी, संजय दसरपुरीया हे कार्यकारिणी सदस्य आहेत.