वसईत बुडालेल्या मुलींचे मृतदेह सापडले

विरार : वसई पूर्वेच्या राजावली येथील दगडखाणीत साचलेल्या तलावात बुडालेला दोन्ही अल्पवयीन मुलींचे मृतदेह गुरुवारी सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. तलावाच्या काठावर उतरून सेल्फी काढण्याच्या आणि टिकटॉक बनवण्याच्या प्रयत्नांत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. फिरायला आलेल्या चौघा मुलांचा एकत्रित सेल्फी पोलिसांना सापडला आहे.

बुधवारी मुंबईहून शाळेला दांडी मारून चार अल्पवयीन मुले वसईला आल्या होत्या. नायगाव पूर्वेच्या राजावली येथे ते फिरण्यासाठी आले होते. यात खुशबू सिंग, दीप्ती सिंग या दोन मुली तसेच सनी जयस्वाल आणि अंकित धोबी या दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. ही मुले मुंबईच्या वांद्रे परिसरातील खारदांडा परिसरातील असून यातील दोन मुली या सातवीत शिकत होत्या तर मुले ही ९ वी आणि १० वीत शिकत होती. यातील सनी जयस्वालची बहिण राजावली परिसरात राहत असल्याने त्याला या परिसराची माहिती होती. तलावाच्या परिसरात ते फिरत असताना छायाचित्रे घेत होते. राजावली येथील एका खदाणीच्या ठिकाणी पोहचले. यावेळी मुलींचा पाण्यात उतरण्याचा      मोहन आवरल्याने त्या पाण्यात उतरल्या आणि पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्या बुडाल्या. ही मुले सेल्फी घेत होती आणि टिकटॉक बनवत होती. त्या प्रयत्नात त्या बुडाल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. वालीव पोलिसांनी मात्र त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. आम्ही याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. मात्र सेल्फी अथवा टिकटॉक काढताना मृत्यू झाल्याचे अद्याप आढळून आलेले नाही, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली.

खदाणी जिवघेण्या

वसई-विरार परिसरातील दगडांच्या धोकादायक ठरत आहेत. या खदाणी शहराच्या निर्जन ठिकाणी असल्याने अनेकवेळा प्रेमीयुगालांसाठी ही मोक्याची जागा ठरत आहेत. दगड खाणीचे उत्खनन करताना मोठे मोठे खड्डे तयार होतात या खड्डय़ात पावसाळ्यात पाणी भरल्याने या खड्डय़ांना तलावाचे स्वरूप येते. यामुळे या ठिकाणी अनेक जण पोहोण्यासाठी उतरतात. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाल्याने जीव गमवावा लागला आहे.