बदलापूरपाठोपाठ आता आपल्या स्वप्ननातील घर घेण्यासाठी मध्यमवर्गीय नोकरदारवर्ग वांगणीकडे वळतो आहे. मात्र, वांगणीतील एका बांधकाम व्यावसायिकाने एकच घर तीन जणांना विकून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. वांगणीतील बांधकाम व्यावसायिक रऊफ शेख याने ही फसवणूक केली असून सध्या तो खरेदीदारांचे पैसे घेऊन फरार झाला आहे. त्याच्या विरोधात कुळगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांगणीत आयन प्लाझा ही तीन मजल्यांची इमारत बांधकाम व्यावसायिक रऊफ शेख याने उभारली होती. या इमारतीत घर घेण्यासाठी नाजिया शेख यांनी बांधकाम व्यावसायिकाला टप्प्याटप्प्याने धनादेशद्वारे पाच लाख रुपये दिले. मात्र पैसे देऊनही बांधकाम व्यावसायिक घराची नोंदणी करून देत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता विकत घेतलेले घर यापूर्वी दुसऱ्याला विकल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे नाजिया यांनी इमारतीत भेट दिली असता तेथील अनेक घरांना एकाहून अधिक टाळे लावल्याचे समोर आले. त्यामुळे एक घर दोन ते तीन जणांना विकण्याचा पराक्रम या बांधकाम व्यावसायिकाने केल्याचे समोर आले. नाजिया शेख यांच्यासह अनेक जण सध्या बांधकाम व्यावसायिकाचा शोध घेत आहेत. कुळगाव पोलीस ठाण्यात रऊफ शेख याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.