जिल्हा प्रशासन मोहीम राबविणार

तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाला प्रतिबंध बसावा, तसेच कर्करोगाने नागरिकांचा मृत्यू होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्य़ातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विकण्यावर असलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा आरोग्य विभागाने घेतला आहे.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची बैठक नुकतीच पार पडली असून त्यामध्ये हा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस डॉ. गौरी राठोड, ठाण्याचे विक्रीकर आयुक्त डॉ.ऋषीकेश वाघ, कामगार अधिकारी गो.वा.पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी दि.ज्ञा. कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतातच नव्हे तर जगातही तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनाने अनेक लोकांचे कर्करोगामुळे बळी जात आहेत. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी विद्यार्थी दशेपासून हे पदार्थ सेवन करु नयेत म्हणून शैक्षणिक संस्थांच्याजवळ तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर असलेल्या बंदीच्या नियमांची कडक अमंल बजावणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तंबाखू उत्पादनात आणि सेवनातही भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच देशात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली असून या नियमांचे उल्लंघन केले तर त्या व्यक्तीला जागेवरच दोनशे रुपये दंड आकरण्याचा कायदा आहे. या नियमाचीही कर्करोग नियंत्रणासाठी कडक अंमलबजावणी करण्याविषयी चर्चा बैठकीत झाली. कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून या रोगाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच विक्रेत्यांनी दुकानांसमोर दिलेल्या सुचना फलक लावावेत, यासाठी मोहीम हाती घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.