बेकायदा बांधकाम केल्याचा दावा
कल्याणमधील भाजपचे खडकपाडा प्रभागातून निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक अर्जुन भोईर यांनी त्यांच्या चिकणघर येथील वडिलोपार्जित जागेवर बेकायदा बांधकाम केले आहे. हे बांधकाम पालिकेने अनधिकृत म्हणून घोषित केल्याने मुंबई महापालिका प्रांतिक अधिनियमाच्या कलमानुसार अर्जुन भोईर यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे या प्रभागातील पराभूत उमेदवार योगेश पाटील यांनी अ‍ॅड. मधुसूदन निरगुडकर यांच्यातर्फे निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली आहे.
राज्य निवडणूक आयुक्तांना या नोटिसीची प्रत पाठवण्यात आली आहे. कल्याणमधील खडकपाडा प्रभागातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून योगेश पाटील, भाजपचे उमेदवार म्हणून अर्जुन भोईर यांनी निवडणूक लढवली. भोईर या प्रभागातून विजयी झाले आहेत. अ‍ॅड. निरगुडकर यांनी कायदेशीर नोटिसीत म्हटले आहे, अर्जुन भोईर हे दहा वर्षांपूर्वी पालिकेत नगरसेवक होते. या कालावधीत त्यांनी त्यांच्या मालकीच्या चिकणघर येथील जागेत अनधिकृत बांधकाम केले आहे. पण, भोईर यांनी हा दावा फेटाळून लावताना हे बांधकाम १९८३ पूर्वीचे असल्याचे सांगत आहेत.
पालिका प्रशासनाने या बांधकामाबाबत कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून अर्जुन भोईर व त्यांच्या नातेवाईकांना या बांधकामाची कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. नंतर, या बांधकामाबाबत प्रत्यक्ष सुनावणी घेतली. परंतु, या दोन्ही प्रक्रियांना भोईर हे तोंड देऊ शकले नाहीत. अखेर पालिकेने त्यांचे बांधकाम बेकायदा घोषित केले आहे, असे योगेश पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. निरगुडकर यांनी पाठवलेल्या नोटिसीत म्हटले आहे.
महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमाप्रमाणे कोणीही लोकप्रतिनिधी, त्याचे नातेवाईक बेकायदा बांधकामांशी संबंधित असतील तर त्याचे नगरसेवक पद रद्द होऊ शकते. या कायद्याचा आधार घेऊन अर्जुन भोईर यांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी योगेश पाटील यांनी अ‍ॅड. निरगुडकर यांच्यातर्फे निवडणूक आयोगाकडे केली आहे. अधिक माहितीसाठी भाजपचे नगरसेवक अर्जुन भोईर यांच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही. भाजपने आपले उमेदवार अज्ञातस्थळी हलवले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, असे त्यांच्या निकटवर्तीनी सांगितले.