कल्याण-डोंबिवलीकरांपुढे १०० वचने; विकासाचे स्वप्न
भाजपसोबत दोन हात करत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या शिवसेनेने सोमवारी पक्षाचा स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध करून कल्याण-डोंबिवलीकरांपुढे वेगवेगळ्या स्वरूपाची तब्बल १०० आश्वासने मांडली. यापैकी जवळपास ३८ आश्वासने जुनीच असून, गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेच्या वचननाम्यात ती असतात. या वचननाम्याच्या माध्यमातून विकासाचे मोठे स्वप्न कल्याण, डोंबिवलीकरांना दाखविण्यात आले असले तरी मागील पानावरून पुढे असाच या आश्वासनांचा प्रवास असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. पाच वर्षांपूर्वीच्या वचननाम्यात असाच विकासकामांचा डोंगर शिवसेनेने उभा केला होता. या वेळच्या वचननाम्यात विकासाचे ३० प्रकल्प पूर्ण केल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी असलेला हा वचननामा आहे. यावेळी शिवसेना नेते अनिल देसाई, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नरेश म्हस्के, महापौर कल्याणी पाटील उपस्थित होते. वाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवली शहरांचा विचका झाला आहे. दोन वर्षांपूर्वी अडीच हजार कोटीचा एकात्मिक शहर विकास आराखडा सत्ताधारी शिवसेना-भाजपने मंजूर केला आहे. लालफितीत अडकलेल्या या आराखडय़ावरील धूळ झटकण्याऐवजी पुन्हा वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. आधारवाडी येथे ट्रक टर्मिनल, विविध भागात पार्किंग प्लाझा, दुर्गाडी येथे नवीन पूल, रेल्वे स्थानक परिसरांचा कायापालट, रखडलेल्या गोविंदवाडी रस्त्यामधील कायदेशीर अडथळे दूर करणार, डब्यात चाललेल्या परिवहन सेवेचे सक्षमीकरण करणार, शहराला चोवीस तास पाणी उपलब्ध करून देणार, जलसंचय योजना राबवणार, अशा योजना या जाहीरनाम्यात आहेत.

नवीन काय?

वचननाम्यावरील आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहीने प्रकाशित करण्यात आले आहे. यापूर्वी तेथे जिल्हा नेत्यांची स्वाक्षरी असायची.
’व्यापारी संकुल
’चौपाटय़ांचा विकास
’समूह विकास योजना
’जलवाहतूक, जलक्रीडा केंद्र
’ई टॉयलेट सुविधा
’जल नियोजन आराखडा
’स्वा. सावरकर, लो. टिळक यांचे स्मारक
’सौर शहराची संकल्पना राबवणार
’मतिमंद मुलांसाठी स्वतंत्र केंद्र
’ऑनलाइन बिल भरणा केंद्र
’ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅप.

विरोधकांनी मागील काही वर्षांत शिवसेनेने कल्याण-डोंबिवलीत काय केले म्हणून जो अपप्रचार चालवला आहे. त्याला आम्ही वचननाम्याच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. या शहराला, २७ गावांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्यामुळे विरोधकांनी काहीही टीका केली, तरी जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे. शिवसेनेची बांधीलकी विकास आणि जनतेशी आहे. या पाठबळामुळे शिवसेनेला या निवडणुकीत ६५ हून अधिक जागा मिळतील.
एकनाथ शिंदे, आमदार, शिवसेना