ठाणे महापालिका आयुक्तांचा आदेश

ठाणे : घरोघरी ताप तपासणीत किंवा दवाखान्यांमध्ये तापसदृश लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींना केवळ औषधे देऊन घरी पाठवू नका तर त्यांना विलगीकरण कक्षात पाठवा, असे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच शहरातील प्रतिबंधित क्षेत्र आणि घरोघरी सर्वेक्षणात हयगयी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने घरोघरी ताप तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. प्रभाग समितीस्तरावर विशेष पथकांकडून ही तपासणी केली जात आहे. या ताप तपासणीच्या कामावर भर देऊन त्यामध्ये तापसदृश लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना तापाची किंवा इतर औषधे देऊन घरी पाठवू नका तर त्यांना विलगीकरण कक्षात पाठवा. जेणेकरून करोनाची साखळी तुटण्यास मदत होईल, अशा सूचना आयुक्त सिंघल यांनी केल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर काही गोष्टी शिथिल कराव्या लागतील, हे लक्षात ठेवून प्रतिबंधित क्षेत्रामध्ये काहीही सुरू राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

आयुक्तांच्या सूचना

* प्रत्येक प्रभाग समितीमध्ये होमिओपॅथीची औषधे वितरित करण्याबरोबरच एक महिन्यानंतर त्याचा दुसरा डोस घेतला जातो किंवा कसे याचाही पाठपुरावा करा.

* जे रुग्ण सापडताहेत ते सिमटोमॅटिक किंवा असिमटोमॅटिक आहेत, याचीही माहिती संबंधित परिमंडळ उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांनी अद्ययावत करावी.

* प्रत्येक प्रभागाच्या संपर्क अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष फिल्डमध्ये काम करावे.