आनंद नाडकर्णी, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ
ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन असे म्हणतात. स्वत:चे अनुभवविश्व अधिक प्रगल्भ करण्यासाठी दिसामाजी काही तरी चांगले वाचीत जावे, असे म्हणतात. ठाणे परिसरातील विविध क्षेत्रांतील नामवंत त्यांचा छंद कसा जोपासतात, त्यांच्या संग्रहात कोणती पुस्तके आहेत. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत पुस्तके वाचण्यासाठी ते कसा वेळ काढतात. याचा धांडोळा घेणारे हे सदर.. आपल्या वाचनछंदाविषयी सांगताहेत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी..

ज्या वयात मुलाला साधारण अक्षरओळख होते त्या वयात मी वाचायला लागलो होतो. मी लहान असताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा काळ होता. त्यामुळे आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’ वृत्तपत्राचे खूप वाचन केले. त्या काळात वृत्तपत्रात वाचलेले मथळे आजही स्मरणात आहेत. वडिलांना वाचनाची आवड असल्याने आमच्या घरातच ग्रंथालय होते. माझ्यापेक्षा माझे भाऊ आणि बहीण मोठे असल्याने त्यांची पुस्तके वाचायला मिळाली.
तेव्हापासून वाचनाची सवय लागली. पाचवी-सहावीत असतानाच माझा पुस्तकसंग्रह झाला. मराठी जलद गतीने वाचायची सवय लागली. त्यामुळे आता १५० ते २०० पानांचे पुस्तक एका दिवसात सहज वाचून होते. माझी बहीण कला शाखेची विद्यार्थिनी होती. मराठी साहित्य हा तिचा विषय होता. त्यामुळे अनेक मराठी पुस्तके आमच्या घरी होती. जळगावच्या एम. जे. महाविद्यालयात माझे शिक्षण झाले. या महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील ग्रंथालय खूप मोठे होते. महाविद्यालयाचे हे ग्रंथालय माझ्या आयुष्यातील पहिले ग्रंथालय ठरले. या ग्रंथालयामुळे अनेक उत्तमोत्तम पुस्तके वाचता आली. मराठी भाषेतील सर्व प्रकारचे वाङ्मयप्रकार वाचले. लहान वयातच टॉलस्टॉय, साने गुरुजी यांची पुस्तके वाचली. अशा वाचनामुळे स्मरणशक्ती चांगली झाली. मुंबईत पार्ले टिळक महाविद्यालयात आल्यावर लहानपणीच केलेल्या वाचनाने साथ दिली. बाबासाहेब पुरंदरेंचे शिवचरित्र तोंडपाठ असल्याने तासिकेला प्राध्यापकशिवचरित्र म्हणायला सांगायचे. शिवचरित्र म्हणता येणारा महाविद्यालयातील मी एकमेव विद्यार्थी असल्याने कौतुक व्हायचे. वाचनामुळे प्रतिष्ठा मिळाली, असे मला वाटते.
मेडिकलला येईपर्यंत इंग्रजी वाचन सुरू झालेले नव्हते. इंग्रजी पुस्तके तशी महाग असतात. मात्र पूर्वी कमी दरात फुटपाथवर ही पुस्तके मिळायची. अशी पुस्तके विकत घेऊन सुरुवातीला इंग्रजी रहस्यकथा वाचल्या. हळूहळू इंग्रजी वाचनाला गती मिळाल्यावर गंभीर वाचनाकडे वळलो. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत इंग्रजी पुस्तकांचाही घरी संग्रह तयार झाला. इंग्रजी वाचन वाढल्यावर मराठी वाचन तुलनेने कमी झाले. मी स्वत: पुस्तके लिहायला लागल्यावर अनेक पुस्तकांचे वाचन झाले. त्या काळात विशिष्ट उद्देशाने पुस्तके वाचू लागलो. गेल्या २५ ते ३० वर्षांत माझ्याकडील संग्रहातील अनेक पुस्तके मी संस्था आणि शाळांना दिली आहेत. दहा वर्षांपूर्वी मी ललित साहित्याचा संग्रह न करण्याचा निर्णय घेतला. आता माझ्याकडे बहुतेक संदर्भग्रंथ आहेत. माझ्या विशेष आवडीची पुस्तकेही मी संग्रही ठेवली आहेत. त्यात मानसिक आरोग्य, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र, शिवाजी महाराजांवरील साहित्य, स्वातंत्र्यलढा, जागतिक इतिहास, मानववंशशास्त्र, तत्त्वज्ञान अशा विषयांवरील १२०० ते १४०० पुस्तकांचा संग्रह आहे. डॉक्टरांचा मराठी गाण्यांचा वाद्यवृंद आहे. या कार्यक्रमाच्या निरूपणाची जबाबदारी माझ्याकडे असते. त्यामुळे आरती प्रभू, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, बा. भ. बोरकर आदी कवींचे कवितासंग्रह माझ्याकडे आहेत.
एका वेळी एकच पुस्तक वाचण्याची माझी सवय नाही. मी एकाच वेळी ९ ते १० पुस्तके वाचतो. आळीपाळीने मग जशी इच्छा होईल, त्याप्रमाणे एखादे पुस्तक निवडून वाचतो. एखादे वाचलेले पुस्तकही पुन्हा वाचायला काढतो. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट मला आवडला नाही. त्यामुळे त्याचे काही संदर्भ सापडतात का हे पाहण्यासाठी गोविंद सरदेसाईंचे ‘मराठी रियासत’ पुन्हा वाचायला घेतले. विनोबा हे माझे आवडते लेखक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लिहिलेली किंवा त्यांनी लिहिलेली अशी ८७ पुस्तके संग्रहात आहेत. अनेक उद्दिष्टांसाठी वाचतो. आता केवळ विरंगुळ्यासाठी वाचत नाही. कुतूहल म्हणून वाचतो. आपले वाचन जसे आपल्यासाठी उपयुक्त आणि आनंददायी असते, तसे ते इतरांनाही उपयुक्त ठरावे, असे माझे मत आहे. आता तरुणांना पुस्तकांसोबत इंटरनेटसारखा पर्याय उपलब्ध आहे. पुस्तके, इंटरनेट, वृत्तपत्रे यांच्या एकत्रित वाचनाने वाचनसंस्कृतीची वाढ होण्यास मदत होईल.

सध्याचे वाचन
सध्या गोविंद सरदेसाईंचे मराठी रियासत, दिलीप जेसते यांचे पॉझिटिव्ह सायक्र्याटी, गिरीश कुबेर यांचे ‘युद्ध जिवांचे’, ‘हा तेल नावाचा इतिहास आहे’, ‘टाटायन’, ‘फॉलो एव्हरी रेन्बो’, ‘द इंडियन्स’ ही सुधीर कक्कर यांची पुस्तके, श्याम हॅरिस यांचे ‘वेकिंग अप’ ही पुस्तके वाचत आहे. याशिवाय निळू दामले यांचा ब्लॉग मी नित्य नेमाने वाचतो.

शब्दांकन- किन्नरी जाधव