ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अटक

ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकने अटक केली असून राजू कृष्णा शेट्टी असे अटक केलेल्या म्होरक्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख ९४ हजार ८५० किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

ठाणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास करणारी टोळी शहरात सक्रिय झाली होती. अशाच प्रकारचा एक गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या

युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान पथकाने राजू शेट्टी याला मुंबईतून अटक केली. खोपट, राममारुती रोड, मासुंदा तलाव, प्रजापती ब्रह्मकुमारी चौक आणि ठाणे स्थानक अशा पाच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

त्याच्याकडून ३ लाख ९४ हजार ८५० किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. साथीदारांच्या मदतीने त्याने हे गुन्हे केले असून त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.